पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 01:34 PM2023-01-13T13:34:39+5:302023-01-13T13:35:07+5:30
रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे यंत्राच्या साहाय्याने तोडून टाकण्यात येत आहेत
मानाजी धुमाळ
रेठरेधरण : पुणे ते बंगळुरू या आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. वाळवा तालुक्यात पेठनाका ते कासेगावदरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली लहान-मोठी झाडे तोडून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर पेठनाका येथील पुलाच्या भरावाचे काम सुरू करण्यात आले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूस असणारी व रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे यंत्राच्या साहाय्याने तोडून टाकण्यात येत आहेत. पाणी जाण्यासाठी असलेल्या पुलाच्या ठिकाणी सिमेंट पाइप टाकून बांधकाम करण्यात येत आहे.
कासेगाव येथे रस्त्यास अडथळा ठरणाऱ्या सुमारे ४० घरांचे बांधकाम पाडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येईल. त्याबाबत रहिवाशांना सूचना देण्यात आली आहे. त्यांच्या नुकसानभरपाईबाबत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व ग्रामपंचायत पातळीवर निर्णय हाेणार आहे.
महामार्गावर वाळवा तालुक्याच्या हद्दीतील येवलेवाडी फाटा, नेर्ले, काळमवाडी, केदारवाडी फाटा, वाघवाडी फाटा, कामेरी, येलूर येथील अपघातप्रवण क्षेत्रात उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. कासेगाव व पेठ येथील उड्डाणपूल तसेच राहतील.
शेंद्रे ते कागल या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण कामाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांनी कराड येथे दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी केले होते. यानंतर काम कधी सुरू होणार याची उत्सुकता होती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दोन पॅकेजमध्ये कागल-सातारा विभागात काम सुरू केले आहे. पॅकेज १ मध्ये कागल ते पेठनाका व पॅकेज २ मध्ये पेठनाका ते शेंद्रे-सातारा असे काम होणार आहे. दोन्ही पॅकेजसाठी दोन कंपन्यांना काम देण्यात आले आहे. या सहापदरी रस्त्याचे व सेवा रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक व्ही. डी. पंधरकर यांच्या देखरेखीखाली शेंद्रे ते पेठ नाका व पेठनाका ते कागल असे एकूण १३३ किलोमीटरचे काम होणार आहे.
कागल ते पेठनाकापर्यंतचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू करण्याचे आणि जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, पेठनाका ते शेंद्रेपर्यंतचे काम सुरू करण्यात आले आहे, ते डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे, असे केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले आहे.