पुणे-हुबळी ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ येत्या रविवारपासून धावणार; सातारा, सांगली, मिरजेत थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:58 AM2024-09-09T11:58:33+5:302024-09-09T11:59:16+5:30

कोल्हापूरसाठी पाठपुरावा सुरूच, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारा सेतू

Pune Hubli Vandebharat Express will run from next Sunday Will stop at Satara Sangli Miraj | पुणे-हुबळी ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ येत्या रविवारपासून धावणार; सातारा, सांगली, मिरजेत थांबणार

पुणे-हुबळी ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ येत्या रविवारपासून धावणार; सातारा, सांगली, मिरजेत थांबणार

सांगली : ऐन गणेशोत्सवात पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना खूशखबर मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकला जोडणारी ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ मंजूर केली आहे. हुबळी ते पुणे (गाडी क्र. २०६६९) व पुणे ते हुबळी (क्र. २०६७०) या दोन गाड्या मिरज, सांगली, सातारामार्गे येत्या १५ सप्टेंबरपासून धावणार आहेत. याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

पुणे-हुबळी वंदेभारत रेल्वे सुरू करून सांगली व मिरज येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदेभारत सुरू करण्याची मागणी रेल मंत्रालयाकडे केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबवण्याची विनंती रेल्वेकडे केली होती. या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी-पुणे मार्गावर दोन गाड्यांना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.

हुबळी ते पुणे अशी धावणार

हुबळीतून पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून धारवाडला ५:१५ला, बेळगावला ६.५५, मिरजेत ९:१५ला, सांगलीत ९:३०ला, सातारा स्थानकावर १०:३५ तर पुण्यात दीड वाजता पोहोचेल.

पुण्यातून दुपारी २:१५ला सुटणारी वंदेभारत सातारा येथे ४:०८ला, सांगलीत ६:१०, मिरजेत ६:४५, बेळगावला ८:३५, धारवाडला १०:२० तर हुबळीत पावणेअकरा वाजता पोहोचेल.

‘वंदेभारत एक्स्प्रेस’ची वैशिष्ट्ये

  • आठ कोचची संपूर्ण वातानुकूलित गाडी
  • सोमवार सोडून रोज धावणार
  • ६६ किलोमीटर प्रतितास वेग
  • अंतर ५५८ किलोमीटर


किती वेळात होणार प्रवास

  • पुणे ते सांगली : ३.५५ तास
  • सांगली ते बेळगाव : २.२३ तास
  • सांगली ते हुबळी : ४.३३ तास
  • बेळगाव ते हुबळी : २.१० तास
  • पुणे ते हुबळी : साडे आठ तास


कोल्हापूरसाठी पाठपुरावा सुरूच

कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदेभारत एक्स्प्रेस मंजूर असून, विद्युतीकरणासह अन्य काही तांत्रिक कारणासाठी ती थांबवली आहे. लवकरच ही गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. -उमेश शहा, सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप

Web Title: Pune Hubli Vandebharat Express will run from next Sunday Will stop at Satara Sangli Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.