पुणे रेल्वे विभागाकडून २.१३ लाख टन विक्रमी मालवाहतूक, महसूलात १११ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 02:00 PM2022-04-06T14:00:19+5:302022-04-06T14:09:51+5:30

पुणे रेल्वे विभागातून देशातील अनेक भागात ऑटोमोबाईल्स, साखर, पेट्रोलियम उत्पादने यासह विविध प्रकारच्या मालाची नियमित वाहतूक करण्यात येते.

Pune railway department's record 2.13 lakh tonnes of freight, 111 per cent increase in revenue | पुणे रेल्वे विभागाकडून २.१३ लाख टन विक्रमी मालवाहतूक, महसूलात १११ टक्के वाढ

पुणे रेल्वे विभागाकडून २.१३ लाख टन विक्रमी मालवाहतूक, महसूलात १११ टक्के वाढ

googlenewsNext

सदानंद औधे

मिरज : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, मिरज, कराड, सातारा, बारामती या स्थानकातून ४३७ मालगाड्यांतून ११ लाख ६० हजार टन साखर वाहतूक करण्यात आली. पुणे विभागाने यावर्षी २.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक करून २७५ कोटी ३४ लाख रुपये महसूल मिळविला. पुणे विभागाची मालवाहतुकीतील आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यावर्षी महसूलात १११ टक्के वाढ झाली आहे.

पुणे रेल्वे विभागातून देशातील अनेक भागात ऑटोमोबाईल्स, साखर, पेट्रोलियम उत्पादने यासह विविध प्रकारच्या मालाची नियमित वाहतूक करण्यात येते. पुणे विभागाने एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या वर्षात २.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक करून २७५ कोटी ३४ लाख रुपयांचा महसूल मिळवला. गेल्या आर्थिक वर्षात १.२८ दशलक्ष टन मालाच्या वाहतुकीद्वारे १३० कोटी ४२ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात १११ टक्के वाढ झाली आहे. पुण्यातील चिंचवड व खडकी स्थानकावरून ७५५८ वॅगनद्वारे ३०१ मालगाड्यांतून देशातील विविध राज्यांसह, बांग्लादेश व नेपाळमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने पाठवण्यात आली. याद्वारे ४५ कोटी ५१ लाख रुपयांचा महसूल रेल्वेला मिळाला.

पुणे विभागात गूळ मार्केट कोल्हापूर, सांगली, मिरज, कराड, सातारा, बारामती या स्थानकातून साखरेची वाहतूक करण्यात येते. यावर्षी १८३३० वॅगनद्वारे ४३७ मालगाड्यांतून ११ लाख ६० हजार टन साखर रवाना करण्यात आली. लोणी स्थानकातून ४६४६ वॅगनद्वारे ९३ मालगाड्यांमधून दोन लाख ३९ हजार टन पेट्रोलियम उत्पादने पाठविण्यात आली. २१ वॅगनमधून खत पाठविण्यात आले. २१ वॅगनद्वारे कोरडे गवत पाठविण्यात आले.

वाणिज्य व संचालन विभागाने जाेडले नवीन ग्राहक

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या व्यवसाय विकास युनिट अंतर्गत वाणिज्य व संचालन विभागाच्या पथकाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध नवीन ग्राहक जोडण्यात आले. रेल्वेची जलद वाहतूक, किफायतशीर दर, सुरक्षित परिचालन या वैशिष्ट्यामुळे मालवाहतूक व्यवसाय वाढला आहे.

Web Title: Pune railway department's record 2.13 lakh tonnes of freight, 111 per cent increase in revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.