विनामास्क फिरणाऱ्यांना उठाबशांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:28 AM2021-03-10T04:28:04+5:302021-03-10T04:28:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी कंबर कसली आहे. मास्कचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी कंबर कसली आहे. मास्कचा वापर न करता फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाईसाठी नियुक्त केलेल्या टास्क फोर्सने मंगळवारी बसस्थानकाच्या परिसरात एका तरुणाला उठाबशा काढायला लावल्या. गेल्या आठ दिवसांत या टास्क फोर्सने ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर टास्क फोर्समार्फत कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मंगळवारी बसस्थानकाच्या परिसरात टास्क फोर्सच्या वतीने जनजागृती करण्यात आली. यावेळी एक तरुण विनामास्क फिरताना आढळून आला. त्याला उठाबशा काढण्यास लावले. माजी सैनिकांच्या टास्क फोर्सकडून गेल्या आठ दिवसांत विनामास्क १६० जणांवर कारवाई करीत ३२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्सकडून कारवाई सुरू असून, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन आस्थापना अधिकारी अनिल चव्हाण यांनी केले आहे.