जिल्हा प्रशासन नियुक्त कंपनीकडूनच व्हेंटिलेटर्सची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:28 AM2021-05-12T04:28:19+5:302021-05-12T04:28:19+5:30
सांगली : जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडूनच १० व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली असून त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी ...
सांगली : जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडूनच १० व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली असून त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. आज, बुधवारी यावर सभेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
कोरोना रुग्णांसाठी सध्या व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महापालिकेने दहा व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याबाबतचा निर्णय महासभेत घेतला होता. त्यासाठी रीतसर निविदाही प्रसिद्ध केली. मात्र निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडूनच ही यंत्रे खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला दिला आहे. यावर २४ तासांत निर्णय घ्यावा, अशी सूचनाही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली आहे. त्यामुळे आज, बुधवारी दुपारी ४.३० वाजता तातडीने स्थायी समिती सभा घेऊन यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
दुसरीकडे, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने त्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. ऑक्सिजन प्रकल्पाचेही निविदा प्रक्रियेमुळे त्रांगडे झाले आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी किमतीत हा प्रकल्प करण्याची तयारी एका शासननियुक्त कंपनीने दाखविली होती. त्याबाबत निर्णय न घेता निविदा प्रक्रियेचा गोंधळ महापालिकेने घातला. त्यामुळे ही कंपनीही अन्यत्र निघून गेली. आता हा प्रकल्पही रेंगाळला आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
चौकट
साडेपाच लाखांना एक व्हेंटिलेटर
जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडून सध्या एका व्हेंटिलेटरला साडेपाच लाख रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे महापालिकेला १० व्हेंटिलेटर्सकरिता ५५ लाख रुपये खर्च येणार आहे. सभापती पांडुरंग कोरे म्हणाले की, आमदार सुरेश खाडे यांच्या आमदार फंडातून जिल्हा प्रशासनाने नुकतेच व्हेंटिलेटर खरेदी केले आहे. त्या कंपनीची निविदा प्रक्रिया झाली असून दरही निश्चित आहेत. त्यानुसार साडेपाच लाख रुपयांना एक असे ५५ लाख रुपयांचे दहा व्हेंटिलेटर या कंपनीकडून खरेदीचा निर्णय घेण्यात येणार आहे.