भाजपकडून शुध्द पाणी, वायफायची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:20 PM2018-07-24T23:20:54+5:302018-07-24T23:21:10+5:30
सांगली : चोवीस तास शुद्ध पाणी, माफत दरात आरोग्यसेवा, प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधा, महिलांसाठी उद्योजक गट, पुरेशी स्वच्छतागृहे अशी विविध आश्वासने देत मंगळवारी भाजपने शहर विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी खा. संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दिनकरतात्या पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर उपस्थित होते. दानवे म्हणाले की, सांगली व जळगाव महापालिकेची निवडणूक सुरू आहे. दोन्ही ठिकाणी भाजप बहुमताने सत्तेत येईल. भाजपने सर्व समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. सांगलीत काँग्रेसचा महापौर होता; त्याला राष्ट्रवादीचे समर्थन होते. काँग्रेसच्या सत्तेचा वाईट अनुभव जनतेला आला आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. विकास नावाची गोष्टच शिल्लक नाही. शासनाने दिलेला निधीही महापालिकेने अडविला आहे. याउलट भाजपने केवळ शहरच नव्हे, तर जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला. त्यामुळे जनता भाजपच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.
जनतेच्या विकासासाठी हे करणार
विकास आराखड्याची अंमलबजावणी व पायाभूत सुविधा
विविध नागरी समन्वय समित्यांचे गठण
उद्योग व उद्योजकता विकास
गुंठेवारीसाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष पॅकेज
चोवीस तास शुध्द व नियमित पाणीपुरवठा
कृष्णा नदीची स्वच्छता व सुशोभिकरण
झोपडपट्टी पुनर्वसनातून प्रत्येकाला घर
आरक्षित भूखंडावर उद्याने, विरंगुळा केंद्रे
मोफत व माफक दरात आरोग्यसेवा
महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त
सीसीटीव्ही, सेफ्टी रोड, वायफाय सुविधा
घरपट्टी व सरचार्ज कर कमी करण्याचा प्रयत्न
दुर्गंधी व दलदलमुक्त शहराचे नियोजन
ठिकठिकाणी भाजी मंडईची उभारणी
महिला कुस्ती केंद्राची स्थापना
शिवाजी मंडई व जुन्या मंडईचे पुनर्निमाण