उमेदीच्या वयातच जगण्याचा उद्देश सापडला पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:20 AM2021-01-10T04:20:18+5:302021-01-10T04:20:18+5:30
फोटो ०९ सेवारती बुक : सांगलीत डॉ. दिलीप शिंदे यांच्या सेवारती पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी इंद्रजित देशमुख, प्रा. अविनाश सप्रे, महेश ...
फोटो ०९ सेवारती बुक : सांगलीत डॉ. दिलीप शिंदे यांच्या सेवारती पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी इंद्रजित देशमुख, प्रा. अविनाश सप्रे, महेश कराडकर, प्रा. एस. बी. जाधव, दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : उमेदीच्या वयातच आपल्या जगण्याचा उद्देश सापडलेली माणसेच मोठी होतात, अशी प्रेरणा डॉ. दिलीप शिंदे यांना सापडल्याने त्यांना मोठे काम उभे करता आले, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांनी केले. सांगलीत सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिंदे लिखित ‘सेवारती‘ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश सप्रे हे होते.
डॉ. शिंदे यांनी संवेदना शुश्रूषागृहातील कोरोना काळातील अनुभवांवर आधारित व्यक्तिचित्रण व अनुभवकथन पुस्तकात केले आहे. तो धागा पकडून देशमुख म्हणाले, तासकाट्यांप्रमाणे असणारे म्हातारपण भरभर पुढे सरकतच नाही. आठवणी सतावत राहतात. लहरी आठवणी हत्तीच्या पायासारखा ठसा उमटवतात. अशावेळी डॉ. शिंदे यांच्यासारखा हात दिलासा देणारा ठरतो. आपण जन्माला कशासाठी आलो हे समजणारा दिवस महत्त्वाचा ठरतो. हा दिवस डॉ. शिंदे यांना समजला आहे. दुसऱ्याचे आयुष्य समृद्ध करता करता स्वत: समृद्ध होता येते, हेदेखील कळले आहे.
महेश कराडकर यांनी स्वागत केले. डॉ. शिंदे यांनी पुस्तकामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमास एस. बी. जाधव, लेखक वसंत केशव पाटील, नामदेव माळी, वैभव माने, डॉ. वर्षा पाटील, वैभव पाटील, माधुरी ठोंबरे, मानसी गानू, पूनम वाघमारे, श्रुती पाटील, गीता लोहार, अनिता माने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना मुळे यांनी केले.