पर्युषण पर्वाला सुंदर परंपरेचा साज

By admin | Published: August 29, 2016 10:43 PM2016-08-29T22:43:00+5:302016-08-29T23:14:15+5:30

उत्साहात पर्वारंभ : गणपती पेठेतील मंदिराची शतकाकडे वाटचाल

Purusha Perla celebrates the beautiful tradition | पर्युषण पर्वाला सुंदर परंपरेचा साज

पर्युषण पर्वाला सुंदर परंपरेचा साज

Next

सांगली : आध्यात्मिक ऊर्जा वाढविण्यासाठी, क्षमा करण्यासाठी आणि क्षमा मागण्यासाठी जैन धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वाची सांगलीतील परंपरा सुंदर गोष्टींनी सजली आहे. मुख्य मंदिरासह पाच ठिकाणी स्थापन झालेल्या मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून सुंदर आरास व धार्मिक कार्यक्रमांची वेगळी परंपरा जपण्यात आली आहे. त्यामुळे येथील या सणाला पाच मंदिरांच्या माध्यमातून पंचरत्नांचा साज चढला आहे.
सोमवारी जैन धर्मिय श्वेतांबर पंथियांच्या आठ दिवस चालणाऱ्या पर्युषण पर्वास सुरुवात झाली. विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पर्व सुरू झाले आहे. सांगलीतील पद्मा थिएटरसमोर श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ देहरासर ट्रस्टचे अमिझरा पार्श्वनाथ देहरासर हे मंदिर ६८ वर्षांपूर्वी उभारण्यात आले. हे मुख्य मंदिर आहे. याठिकाणी रत्नजडीत आरास करण्यात येते. हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
गणपती पेठेतील गोडीजी पार्श्वनाथ मंदिर व्यापाऱ्यांनी उभारलेले आहे. लवकरच या मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. सांगलीतील हे सर्वात जुने मंदिर आहे. रतनशीनगरमध्ये आदिनाथ देहरासर, जवाहर सोसायटीतील धर्मनाथ मंदिर आणि त्रिकोणी बागेजवळील भगवान महावीर मंदिर अशा पाच मंदिरांची सांगलीला मोठी पंरपरा आहे. या पाचही मंदिरांमध्ये एकेक दिवस वैशिष्ट्यपूर्ण आरास करून धार्मिक कार्यक्रम होत असतात. जप, तप, संगीतमय धार्मिक कार्यक्रम यांची रेलचेल या दिवसांमध्ये असते.
पुरुषांसोबत महिलाही मोठ्या उत्साहाने या मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. पर्वकाळात दररोज सायंकाळी प्रतिक्रमण (क्षमा मागणे), रात्री भावना (भक्तिसंध्या) असे कार्यक्रम याठिकाणी होत असतात. पर्युषण पर्व काळात महावीरांचे सैनिक ज्यांना वीरसैनिक म्हटले जाते, ते व्याख्यानासाठी येत असतात. त्यांच्यामार्फत धर्मआराधना केली जाते. सांगली शहरात व जिल्ह्यात श्वेतांबर जैन समाज शेकडो वर्षांपासून आहे. त्यामुळे तितक्या वर्षांची परंपरा या पर्युषण पर्वाला लाभली आहे. तरीही मंदिरांमध्ये कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा जपतानाच त्यास अधिक व्यापकता देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

सणाचा मुख्य उद्देश...
हा सण साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. पूजा-अर्चा, आरती, त्याग, तपस्या आणि उपवास करून अधिकाधिक वेळ संताच्या सान्निध्यात घालविला जातो. गणेश चतुर्थी किंवा ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सरी पर्व साजरे केले जाते. त्या दिवशी लोक उपवास करून पापाला झिडकारून आणि भविष्यात त्यापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतात.

Web Title: Purusha Perla celebrates the beautiful tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.