'पुष्पा स्टाईल' रक्तचंदनाची तस्करी, २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन जप्त; मिरजेत पोलीस आणि वन विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:51 AM2022-01-31T11:51:14+5:302022-01-31T11:52:19+5:30
फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून करत होता तस्करी
मिरज : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रक्षेकांच्या पसंतीस उतरला असला तरी आता यातील रक्तचंदनाची तस्करी मात्र डोकेदुखी ठरत आहे. कारण तस्करी करणारे आता अशाच प्रकारची शक्कल लढवत असल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन तस्करी करणाऱ्या एकाच्या मिरजेत पोलीस आणि वन विभागाने मुसक्या आवळल्या आहेत.
आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या दोन कोटी ४५ लाख ८५ हजाराचे ९८३ किलो ४०० ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून पकडले. यावेळी यासिन इनायतउल्ला (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याला ताब्यात घेण्यात आले.
पुष्पा स्टाईलने रक्तचंदन कर्नाटकातून मिरजेत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर व सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या साह्याने याचा शोध सुरु केला. तस्करी होणारे रक्तचंदन रविवारी पहाटे मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली.
फडणीस यांच्यासह पोलिस पथकाने मिरज – कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा KA-१३-६९०० हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. टेम्पोची तपासणी केली असता त्यात २ कोटी ८५ लाखाचे चंदन सापडले. हे चंदन जप्त करण्यात आले असून हे रक्त चंदन नेमके आले कुठून याचा तपास पोलीस करीत आहेत.