गुणनियंत्रण अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव
By admin | Published: February 11, 2016 12:21 AM2016-02-11T00:21:59+5:302016-02-11T00:31:47+5:30
तासगाव पंचायत समिती सभा : चारा छावण्या सुरु करण्याची मागणी; कृृषी विभागाचा वादग्रस्त कारभार
तासगाव : तासगाव पंचायत समितीकडील गुणनियंत्रण अधिकाऱ्यांचा कार्यभार प्रभारी असल्यामुळे कामे मार्गी लागत नाहीत. याबाबत लोकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांची बदली करण्याचा ठराव पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला. तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, या माणगीचा ठरावदेखील करण्यात आला.
सभापती सुनीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. यावेळी उपसभापती अशोक घाईल, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्यासह सर्व पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते. तासगाव पंचायत समितीच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांबाबत औषध विक्रेते, नागरिकांच्या तक्रारी होत्या. विटा पंचायत समितीत शिल्लक राहिलेले औषध फवारणी पंप तासगाव तालुक्यातील कृषी विक्रेत्यांना सक्तीने विकण्यात आले होते. याबाबत ‘लोकमत’मधून बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत पंचायत समितीच्या सदस्यांनी सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार होत असल्याची टीका सदस्य चंद्रकांत पाटील यांनी केली. चुकीचे प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन गुणनियंत्रण अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव यावेळी घेण्यात आला. तसेच पूर्णवेळ गुणनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या मागणीचाही ठराव यावेळी घेण्यात आला.
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, असा ठरावही यावेळी करण्यात आला. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने टँकर उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणीही यावेळी सदस्यांनी केली. प्रादेशिक पाणी योजनेच्या पाणीपट्टीची एकूण मागणी आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने, या योजनांसाठीचे वीज बिल व्यावसायिक पध्दतीने आकारणी होत आहे. त्यामुळे वाढीव रक्कम शासनाने भरावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
ज्ञानरचनावादासाठी शासनाकडून मदत द्या
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतून ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीचा अवलंब केला जात आहे. विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षण पध्दती उपयोगी आहे. मात्र काही शाळा जुन्या आणि अपुऱ्या वर्गखोल्या असल्यामुळे त्यांना चांगली सुविधा देता येत नाही. त्यामुळे अशा शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
चारा छावण्या, टँकर सुरु करा
तासगाव तालुक्यात सध्या भीषण टंचाईची परिस्थिती आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, या मागणीचा ठराव तासगाव पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला. तसेच मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याच्या मागणीचा ठराव सभेत करण्यात आला