चाळीस हजार चाकांची क्वीन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:28+5:302021-03-06T04:25:28+5:30
नवऱ्यानं कामधंदा करायचा आणि बायकोनं घरदार, मुलंबाळं सांभाळायची, ही वर्षानुवर्षे चालत आलेली जगरहाटी. शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा फायदा घेत महिलांनी ...
नवऱ्यानं कामधंदा करायचा आणि बायकोनं घरदार, मुलंबाळं सांभाळायची, ही वर्षानुवर्षे चालत आलेली जगरहाटी. शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा फायदा घेत महिलांनी ती मोडली. पुरुषी वर्चस्वाला आव्हाने दिली. त्यात त्या यशस्वीदेखील झाल्या. सांगलीच्या पूनम चव्हाण-बागल त्यापैकीच एक. ट्रकद्वारे मालवाहतुकीचा व्यवसाय त्यांनी निवडला. २०१६ मध्ये व्ही स्टार फर्म स्थापन केली. तिच्या माध्यमातून देशभरात ३० ते ४० हजारांहून अधिक ट्रक्सचे जाळे पूनम सांगलीतून नियंत्रित करत आहेत.
एमएस्सी, एमबीए शिक्षणानंतर पूनम यांनी लॉजिस्टिक कंपनीत काही काळ काम केले. व्यवसायातील संधी हेरल्या. स्वत: थेट रस्त्यावर न येतादेखील चाके फिरविता येतात, हे जाणले. नोकरी सोडून फर्म स्थापन केली. गेल्या पाच वर्षांत फर्मची घोडदौड वेगाने सुरू आहे. देशभरातील दोन हजारांहून अधिक वाहतूक कंपन्या फर्मशी जोडल्या आहेत. ३० ते ४० हजारांहून अधिक ट्रक, कंटेनर, ट्रेलर्सचा डाटा कंपनीकडे आहे. देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात अहोरात्र २४ तास त्यांच्या नियंत्रणाखालील ट्रक धावत असतात. सांगलीतील कार्यालयातून दहा जणांची टीम संगणकीय प्रणालीद्वारे ट्रक्सचा समन्वय साधत असते.
ट्रक न अडखळता धावायचा तर त्याची देखभाल-दुरुस्ती, इंधनपाणी महत्त्वाचे, तद्वतच चालकदेखील अत्यंत महत्त्वाचा घटक. पूनम यांनी हे लक्षात घेतले. चालकांच्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले. महामार्गांवरील निवास, जेवण, बँकिंग, पेट्रो कार्ड्स अशा सुविधा निश्चित केल्या. वेळेत डिलिव्हरी हे यशस्वी व्यवसायाचे सूत्र जाणून आखणी केली. या असंघटित क्षेत्राला ऑनलाइनच्या एका माळेत ओवले. वाहतूक अड्ड्यावरून या व्यवसायाला ऑनलाइनच्या प्लॅटफार्मवर आणल्याने सुटसुटीत बनला. आजवर दहा लाख किलोमीटरहून अधिक अंतर त्यांच्या ट्रक्सनी कापले आहे. पाच हजारांहून अधिक डिलिव्हरी केल्या आहेत. देशभरातील ५०० हून अधिक शहरांत पोहोचले आहेत. मालवाहतुकीच्या निमित्ताने लाखोंची रोकड घेऊन प्रवास करणाऱ्या चालकांना रस्त्यात अडवून लुटमारीची भीती नेहमीच असते. हे लक्षात घेऊन पूनम यांनी ५०० हून अधिक चालकांना डिजिटल व्यवहारांचे धडे दिले. त्यामुळे चालकवर्ग आता बिनधास्त ट्रक चालवू लागला आहे.
एका अर्थाने पूनम चव्हाण चाकाची राणी ठरल्यात. संगणकाच्या एका क्लिकवर देशाच्या दोन टोकांमधील अंतर ट्रकद्वारे गाठण्याची महत्त्वाकांक्षा साध्य केलीय. बुद्धिमत्तेत महिला काकणभर सरस असल्याचे दाखवून दिलेय!