वायरमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

By admin | Published: December 15, 2014 10:40 PM2014-12-15T22:40:01+5:302014-12-16T00:02:53+5:30

राजापुरातील घटना : ठोस उपाययोजना करण्याची गरज

Question about the security of the wireman employees | वायरमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

वायरमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Next

तासगाव : राजापूर (ता. तासगाव) येथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पहिलीच नाही, यापूर्वीही अनेक वायरमन धक्क्याने मृत झाले आहेत. एकूणच अशा स्वरुपाच्या जोखमीच्या कामाबाबत वीज वितरण कंपनीने ठोस उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे.
राजापूरमध्ये विजेच्या धक्क्याने मृत झालेले मदतनीस अशोक सुतार हे जरी वीज वितरणचे अधिकृत कर्मचारी नसले, तरी आज त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी राजापूर ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर वीज वितरण कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आंदोलन मिटले. कारवाई झाली, आंदोलन झाले; पण पुढे काय? असे प्रकार अधिकृत कर्मचाऱ्यांच्याबाबतीतही झालेले आहेत. त्यांना नियमाप्रमाणे भरपाईही मिळते; पण खरी कहाणी तिथूनच सुरू होते. माणूस गेल्यानंतर कुटुंबाची होणारी अडचण कशी दूर होणार, हा प्रश्नच आहे. तासगाव तालुक्यातील राजापूरच्या घटनेने हे चर्चेत आले आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक गावात वीज वितरण कंपनीचा अधिकृत वायरमन असतोच. गाव लोकसंख्येने, क्षेत्राने मोठे असल्यास वायरमनची संख्याही वाढते. संबंधित वायरमनची तांत्रिक अडचण असल्यास मदतनीस म्हणून काम करणारेही आहेत.
वीज वितरण कंपनीने वास्तविक अशा स्वरुपाच्या जोखीम असलेल्या कामांसाठी अधिकृत कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत. ते प्रशिक्षितही असले पाहिजेत. त्यांची सुरक्षितता याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी सर्वसामान्यांच्यात चर्चा आहे.
प्रत्यक्षात काम करणारे तसेच त्यासाठी आवश्यक असणारी मदत कार्यालय स्तरातून करणारे हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. तासगाव तालुक्यात यापूर्वीही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तालुक्यात सध्या वीज वितरण कंपनीचे तीन विभाग आहेत. तासगाव ग्रामीण व सावळज या तीन विभागांद्वारे सर्व काम चालते. एकूणच अशा घटनांबाबत आता तरी वीज वितरण कंपनीने सावध व सतर्क होणे गरजेचे आहे. कर्मचारी अधिकृत असो अगर अनधिकृत असो, खांब तर वीज वितरणचाच आहे. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या वायरमनना सूचना देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)

पस्तीसजणांवर गुन्हे दाखल
राजापूर (ता. तासगाव) येथे विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करताना मदतनीस अशोक बबन सुतार यांच्या झालेल्या मृत्यूनंतर तासगावात रविवारी राजापूर ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोकोप्रकरणी सुमारे ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तासगाव पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला.

Web Title: Question about the security of the wireman employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.