सांगली-तुंग रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:56 PM2018-10-21T23:56:00+5:302018-10-21T23:56:05+5:30
सांगली : मरणयातनांचा अनुभव देणाऱ्या सांगली-तुंग या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा पेटला असून, विविध सामाजिक संघटनांनी याविषयी संताप व्यक्त ...
सांगली : मरणयातनांचा अनुभव देणाऱ्या सांगली-तुंग या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा पेटला असून, विविध सामाजिक संघटनांनी याविषयी संताप व्यक्त केला. मंत्री, खासदार, आमदार तसेच जबाबदार अधिकाºयांच्या कुटुंबियांनीच आता याप्रश्नी संबंधितांना जाब विचारावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचतर्फे करण्यात आले आहे.
‘लोकमत’ने या रस्त्याच्या प्रश्नावर आवाज उठविल्यानंतर नेते, अधिकारी खडबडून जागे झाले. नागरिक जागृती मंचने गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले. शेवटी या गोष्टीची दखल घेत शासनाला हा रस्ता राष्टÑीय महामार्गात समाविष्ट करावा लागला. रस्त्याचे तीन टप्प्यातील काम सुरू होते. दोन टप्पे पूर्ण झाले असले तरी, सांगली-तुंग हा पट्टा अद्याप दुरुस्त झालेला नाही. प्रचंड नरकयातना सहन करीत प्रवासी या रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. याप्रश्नी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेत अधिकाºयांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर रस्ते कामास तातडीने सुरुवात करण्याचा निर्णय झाला.
भाजपचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व अन्य नेत्यांनी या रस्तेकामाचा नारळ थाटात फोडला. त्यासाठी मोठा कार्यक्रम घेऊन निधी आणल्याचा गाजावाजा केला. उद्घाटनानंतर दुसºयादिवशी लगेच कामास सुरुवात होईल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र या रस्त्याने त्यानंतर ना खडी पाहिली ना डांबर. होते ते खड्डे अधिकच अक्राळ-विक्राळ रूप धारण करीत आहेत.
सुरुवातीला पॅचवर्क करून, महिनाभर पावसाळ्यासाठी प्रवाशांची सोय करण्यात येईल, त्यानंतर मंजूर निविदेप्रमाणे साडेसहा कोटी रुपयांच्या कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पॅचवर्क सुरू झाले.
पॅचवर्क झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुख्य कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घाईगडबडीत भाजप नेत्यांनी आटोपला, पण त्यानंतर त्याची सुरुवात झाली की नाही, हे पाहण्याची तसदीही घेतली नाही.
वाहनाचे चाक तुटले
सांगलीतील संतोष माळी हे शनिवारी सांगली-तुंग रस्त्यावरून कारने जात होते. त्यावेळी खड्ड्याचा दणका बसल्याने कारचे चाक तुटून सात फुटावर जाऊन पडले. या अपघातात ते थोडक्यात बचावले. नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी याविषयी संताप व्यक्त करताना, या अपघाताची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली आहेत.
पावसाळाही संपला..!
इतके महिने केवळ पावसाळा असल्याने काम करता येत नसल्याचे कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देत होते. आता शासकीय दप्तरी पावसाळा संपल्यानंतरही त्यांना हे काम सुरू करता आले नाही. आता कोणते कारण ते देणार आहेत, असा सवाल संघटनांच्या पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे.