धनगरवाडा, विनोबाग्राम येथील जमिनींची तातडीने मोजणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:25+5:302021-05-25T04:30:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : वनविभागाने धनगरवाडा व विनोबाग्राममधील जमिनी येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे ...

Quickly count the lands at Dhangarwada, Vinobagram | धनगरवाडा, विनोबाग्राम येथील जमिनींची तातडीने मोजणी करा

धनगरवाडा, विनोबाग्राम येथील जमिनींची तातडीने मोजणी करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: वनविभागाने धनगरवाडा व विनोबाग्राममधील जमिनी येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे या जमिनी कशा नोंद झाल्या, याबाबत पंधरा दिवसांत योग्य कागदपत्रे दाखवावीत. सध्या असणाऱ्या या जमिनींची तातडीने मोजणी करावी, असा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

तहसील कार्यालयात धनगरवाडा व विनोबाग्राम येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, युवा नेते विराज नाईक, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जमिनी दिल्याचे शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत, मात्र या जमिनी पुन्हा वनविभागाने परत घेतल्या याचे पुरावे नाहीत. शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा तलाठी मंडळींनी घेतला तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. येथील नागरिकांनी मोजणीसाठी पैसे भरले आहेत. ती तातडीने मोजणी करा. तीन पिढ्या या जमिनी हे शेतकरी कसत आहेत. त्यांनी अतिक्रमण केलेल्या जमिनी हे शेतकरी मागत नाहीत तर हक्काच्या जमिनी मागत आहेत. वनविभागाने मन मोठे करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

आमदार मानसिंगराव नाईक यांनी यावेळी कोणत्या आधारे जमिनी वनविभागाच्या नावे झाल्या ते दाखवा असे विचारून या चुका अशिक्षित नागरिकांच्या आहेत काय , या सर्व जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. शेती करतात त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिलाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली.

सरपंच वसंत पाटील, बाबूराव डोईफोडे यांनी, १५० वर्षे झाली आमच्या तीन पिढ्या संपल्या आहेत. आतातरी आम्हाला न्याय द्या. या जमिनी वनविभागाच्या नावे असल्याने शेती विकसित करणे, घर बांधणे, शेती कर्ज या शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. तसेच वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास नुकसानभरपाई मिळत नाही, असेही सांगितले.

चौकट

आमदारांनी घेतले वन अधिकाऱ्यांना फैलावर

आमदार नाईक यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या जमिनी कोण कसतो ते सांगा असे विचारले असता, अधिकाऱ्यांनी वनविभागाकडे जमिनी असल्याचे खोटे उत्तर दिले. आ. नाईक यांनी या बैठकीतूनच पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह त्या गावाला भेट देऊ या का, मग कळेल सत्य काय ते, असा जाब विचारला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने मान खाली घालून शब्द माघारी घेतले.

Web Title: Quickly count the lands at Dhangarwada, Vinobagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.