सांगलीतील आर. आर. आबांचे स्मारक पुर्णत्वाकडे; मंत्रालय इमारतीच्या स्वरूपात स्मारक
By अशोक डोंबाळे | Published: August 10, 2023 07:59 PM2023-08-10T19:59:15+5:302023-08-10T20:00:02+5:30
‘लक्ष्यवेधी’कार म्हणून राज्याला ओळख असलेल्या माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे आहे.
सांगली : ‘लक्ष्यवेधी’कार म्हणून राज्याला ओळख असलेल्या माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे आहे. मंत्रालयाच्या आकारातील हे स्मारक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असणार आहे. या स्मारकांमध्ये ई-ग्रंथालय, हॉल, मोठी अभ्यासिकासह अर्धपुतळाही स्मारकाच्या दर्शनी भागात उभारण्यात येणार आहे.
राज्यामध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर आर. आर. पाटील यांचे निधन झाले. युती शासनाने त्यांच्या नावाने सभागृह उभारण्यासाठी मंजुरी दिली. आर. आर. आबांच्या शैक्षणिक काळात जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी वसतिगृहात रहात होते. त्याच वसतिगृह परिसरात त्यांचे स्मारक व्हावे, अशी आबा प्रेमींची मागणी होती. त्यानुसार आबांच्या स्मारकास शासनाने मंजूरी देऊन २०१८ मध्ये कामही सुरु झाले आहे.
सलग सहावेळा आमदार झालेले आर. आर. पाटील पंचवीस वर्षे आमदार होते. त्यातील १५ वर्षे मंत्री होते. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री ही पदे त्यांनी भूषवली. अभ्यासू, व्यासंगी आर. आर. आबांच्या कामकाजाचा विधिमंडळात ठसा उमटला. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांचा गौरव झाला. त्यांचे व्यक्तिमत्त्व स्मारकात प्रतिबिंबित करण्याच्या निमित्ताने स्मारक मंत्रालयाच्या स्वरूपात उभारण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये स्मारकात ई-ग्रंथालय, ग्रंथालय, आर्ट गॅलरी, हॉल, मोठी अभ्यासिका असणार आहे. आर. आर. पाटील यांचा अर्धपुतळाही स्मारकाच्या दर्शनी भागात उभारण्यात येणार आहे. तेथे एक डिजिटल वॉलही असणार आहे. त्यावर आर. आर. पाटील यांचे जीवनचरित्र दाखवले जाणार आहे.