आर. आर. आबांकडून आरोग्य विभाग धारेवर
By admin | Published: November 7, 2014 11:03 PM2014-11-07T23:03:53+5:302014-11-07T23:35:10+5:30
कवठेमहांकाळला आढावा बैठक : पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कानपिचक्या
कवठेमहांकाळला आढावा बैठक : पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कानपिचक्या कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ पंचायत समितीमध्ये आज (शुक्रवारी) पार पडलेल्या आढावा बैठकीत आ. आर. आर. पाटील यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर धारेवर धरले. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अपूर्ण असल्यामुळे छोटे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावत याप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला.
पंचायत समितीमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते आ. आर. आर. पाटील यांनी मतदारसंघातील कामाचा आढावा घेण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांची आज बैठक घेतली. कवठेमहांकाळ तालुक्यातील शाळा मोठ्या प्रमाणात ‘क’ वर्गात असून त्या ‘अ’ वर्गात येण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांनी, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. २५:१५ योजनेमधील व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू असलेली अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील राष्ट्रीय पेय योजनेची आठही कामे अपूर्ण असल्याबद्दल छोटे पाटबंधारे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मार्चमध्ये मुदत संपूनही ही कामे अद्याप का पूर्ण झाली नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांना या आठही योजनेचे ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खुलासे मागवावेत व चौकशी करून काम पूर्ण न केल्याबद्दल दोषी अधिकारी व ठेकेदार यांचेवर कारवाईचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यास सांगितले. तालुक्यातील जनतेला वेळेत पाणी मिळण्यास विलंब होत असल्याने अशा दोषी अधिकारी व ठेकेदारावर कडक कारवाई करावी, असे आदेश दिले.
सध्या संपूर्ण राज्यामध्ये डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर आर. आर. पाटील यांनी आरोग्य विभागाचाही आढावा घेतला. तालुका आरोग्यधिकारी संगीता देशमुख यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. तालुक्यामध्ये डेंग्यू रोगाबाबत आरोग्य विभाग व अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारचे जनजागरण केले, असा प्रश्न त्यांनी देशमुख यांना विचारला. मात्र यावेळी देशमुख यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावर आबांनी आरोग्य विभागाने संपूर्ण तालुक्यात आरोग्य अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, समाजातील काही प्रमुख व्यक्तींची समिती गठित करून डेंग्यूबाबत जनजागरण करावे, त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी पूर्णपणे दक्षता घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा प्रकारच्या सूचना दिल्या. सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी शासन पातळीवर जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण करू, अशी ग्वाहीही दिली. (वार्ताहर)
कारवाईचे आदेश
तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेची आठ कामे मार्चमध्ये मुदत संपूनही अद्याप अपूर्ण असल्याने आर. आर. पाटील यांनी छोटे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. गटविकास अधिकारी यांना चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.