Sangli News: श्रेयवादाची जुगलबंदी ठरणार नव्या राजकीय संघर्षाची नांदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 04:41 PM2023-03-27T16:41:40+5:302023-03-27T16:42:03+5:30
आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मतदारसंघातील राजकारण अनेक नावीन्यपूर्ण वळणे घेत पुन्हा संघर्षाच्या वळणावर आले
दत्ता पाटील
तासगाव : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या सत्तानाट्यानंतर कवठेमहांकाळ पाणी योजनेच्या श्रेयवादाचा नारळ फुटला. तेव्हापासून सुरू झालेली श्रेयवादाची चढाओढ तासगाव पंचायत समिती इमारत बांधकामाच्या निधी मंजुरीपर्यंत येऊन ठेपली आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या श्रेयवादाचा संघर्ष राष्ट्रवादीचे रोहित पाटील आणि भाजपचे प्रभाकर पाटील या युवा नेत्यांनी चांगलाच मनावर घेतला आहे. या श्रेयवादाच्या जुगलबंदीने राजकीय संघर्षाची नांदी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने मतदारसंघात युवा नेत्यांच्या संघर्षाचा नवा अध्याय पाहिला मिळत आहे.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील व खासदार संजय पाटील यांच्या गटातील जुन्या संघर्षाची नव्याने सुरुवात कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीनंतर झाली तेव्हापासून आजअखेर हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे.
कवठेमहांकाळचे नगराध्यक्षपद ताब्यात घेताच, शासनाने मंजूर केलेली पाणी योजना आमच्याच प्रयत्नातून झाल्याचा दावा खासदार गटाने केला. तर या पाणी योजनेचा प्रस्ताव देऊन पाठपुरावा केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला तेव्हापासून मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक निधीवर दोन्ही गटांतील नेते दावा करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयवादाचा कांगावा सुरू आहे.
सहा महिन्यांपूर्वी पंचायत समितीला १५ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर झाला. मात्र राज्यातील सरकार बदलल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांनी जुन्या सरकारमधील सर्वच कामांना स्थगिती दिली. त्याचवेळी पंचायत समितीच्या निधीसही स्थगिती मिळाली. ही स्थगिती नुकतीच शासनाकडून शासनाकडून उठवण्यात आली. यावरून समाजमाध्यमांवर श्रेयवाद सुरू झाला. भाजपचे नेते प्रभाकर पाटील यांनी पुराव्यांसह हे आमचेच श्रेय असल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही पुराव्यांसह भूमिका मांडली. या श्रेयवादाने भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःचे स्वतःच समाधान करून घेतले असले तरी सामान्य जनतेला नेमके काम कोणाचे आहे, याचे वास्तव माहीत आहे. मुळातच श्रेयवादाचा आटापिटा कशासाठी? असाच प्रश्न आहे.
पब्लिक सब जानती है...!
आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मतदारसंघातील राजकारण अनेक नावीन्यपूर्ण वळणे घेत पुन्हा संघर्षाच्या वळणावर आले आहे. दरम्यानच्या काळात तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघांतील सर्वच नेत्यांनी संधिसाधू आणि सोयीस्कर भूमिका घेत राजकारण केले. पुन्हा संघर्षाच्या वळणावर आल्यानंतर अनेक वर्षांपासून विकासाचा गाजावाजा पुन्हा सुरू झाला. त्यासाठी श्रेयवादाचा आट्टापट्टा चाललेला आहे. मात्र, ये पब्लिक है, सब जानती है...!’, अशीच भावना जनतेची आहे.