आर. आर. पाटील झाले पोलिसांच्या गराड्यातून मुक्त

By admin | Published: May 25, 2014 12:43 AM2014-05-25T00:43:19+5:302014-05-25T00:47:57+5:30

जनतेशी संवाद : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम?

R. R. Patil became free from the criminal gang | आर. आर. पाटील झाले पोलिसांच्या गराड्यातून मुक्त

आर. आर. पाटील झाले पोलिसांच्या गराड्यातून मुक्त

Next

 कवठेमहांकाळ : गेली चार-साडेचार वर्षे मागेपुढे शासकीय वाहनांचा ताफा आणि पोलिसांच्या संरक्षणात वावरत असलेले गृहमंत्री आर आर. पाटील लोकसभा निवडणूक निकालानंतर पोलिसांच्या गराड्यातून मुक्त झाले. आज (शनिवारी) पोलीस बंदोबस्ताला फाटा देत ते थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले. शेतकर्‍यांना आबांशी थेट संवाद साधता आला. निवडणुकीच्या निकालाची ही किमया असावी, अशी चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू झाली आहे. गृहमंत्री पाटील यांचा दौरा म्हटले की मागेपुढे पोलीस गाड्यांचा ताफा ठरलेलाच. मात्र शनिवारी आबांचा दौरा पोलिसांच्या बंदोबस्तातून मुक्त झाला. कवठेमहांकाळतालुक्यातील एक आणि सांगलीतून आलेली एक अशा दोन पोलीस वाहनांशिवाय कोणतेही वाहन दौर्‍यात दिसले नाही. शिवाय दौर्‍यात एकही पोलीस गणवेशात दिसला नाही. त्यामुळे मळणगावपासून रांजणीपर्यंतच्या दौर्‍यात आबांना शेतकरी आणि सामान्य माणसांशी थेट संवाद साधता आला. गोरगरिबांच्या सुख-दु:खाचे चार शब्दही त्यांच्या कानावर पडले. मळणगाव येथील अग्रणी नदी परिसरातील शेतकर्‍यांनी या पाण्यामुळे आम्ही सुखी झालो, असे सांगितले. पाणी येणार की नाही, याची शाश्वती नव्हती; पण तुमच्यामुळे कडक उन्हातही कृष्णेचे पाणी नाले आणि अग्रणी नदीतून वहात आले, अशा भावना हिंगणगाव येथील शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. मळणगावपासून सुरू झालेल्या या दौर्‍याची सांगता रांजणीजवळ झाली. रांजणीतील शेतकरी म्हैसाळच्या पाण्याची वाट बघत होते. आम्हाला पाणी मिळाले पाहिजे, पाणी आले तरच आमची शेती वाचणार आहे, आम्हाला पाणी कधी मिळणार, अशी विचारणा त्यांनी आबांना केली. धुळगावच्या बंधार्‍यात पाणी आले आहे, तुमच्याकडे यायला फारसा वेळ लागणार नाही, सर्व ताकद वापरून पाणी देईन, अशी हमी आबांनी दिली. लोकसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाल्याने आबांना धक्का बसला आहे. त्यामुळे पोलिसांच्या गराड्यातून बाजूला होऊन जनतेत मिसळले पाहिजे, असा संदेश या निवडणुकीने दिल्याचे बोलले जाते. (वार्ताहर)

Web Title: R. R. Patil became free from the criminal gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.