आबांसारखीच रोहित पाटील यांच्यातही कामाची तळमळ - खासदार नीलेश लंके
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:13 PM2024-08-20T14:13:16+5:302024-08-20T14:15:16+5:30
लोकांनी खंबीरपणे पाठीशी राहण्याचे आवाहन, रांजणी येथे सत्कार
रांजणी : रोहित पाटील यांच्याकडेही आर. आर. पाटील यांच्यासारखी कामाची तळमळ आहे. लोकांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले. ते रांजणी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामस्थांतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते.
यावेळी लंके, खासदार विशाल पाटील व रोहित पाटील यांचा सत्कार सरपंच नीलम पवार, उपसरपंच वैभव भोसले, लोणारवाडीचे सरपंच अजित खोत, उपसरपंच कोळेकर यांच्या हस्ते झाला. लंके म्हणाले, रोहित पाटील हे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे फिक्स आमदार आहेत. दिल्लीत अजूनही आबांच्या नावाची चर्चा होते. त्यांच्याच मार्गावर रोहित पाटील यांची वाटचाल सुरू आहे. मतदारसंघाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही. दूध दर व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महायुतीचे सरकार अपयशी ठरले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार निश्चितपणे सत्तेवर येईल.
रोहित पाटील म्हणाले, आबांची मतदारसंघातील अपुरी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व आघाडीचे सरकार आणण्यासाठी पाठीशी राहावे. मतदारसंघात औद्योगिक वसाहतीचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. झुरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे सुसज्ज सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका अनिता सगरे, संचालक सुरेश पाटील, पिंटू कोळेकर, गणेश पाटील, ताजोद्दीन तांबोळी, जीवनराव भोसले, संजय भोसले, संतोष पवार, शशिकांत पवार, हणमंत देसाई, अमोल भोसले, संताजी भोसले, अजित भोसले आदी उपस्थित होते. डॉ. वीरसेन पवार यांनी प्रास्ताविक केले.
दादा घराणे वाचविल्याबद्दल आभार
यावेळी खासदार विशाल पाटील यांनी केंद्रातील सरकारवर टीका केली. पैसे वाचविण्याच्या नावाखाली अग्निवीर योजना आणून देशाच्या सुरक्षेशी व तरुणांच्या भावनांशी खेळले जात असल्याची टीका केली. वसंतदादांच्या घराण्याचे समाजकारण व राजकारण संपण्यापासून वाचविल्याबद्दल मतदारांचा मी ऋणी राहीन, असे ते म्हणाले.