आर. आर. आबांच्या लाेकाभिमुख वारशावर कर्तृत्वाची मोहोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 04:04 PM2022-01-22T16:04:20+5:302022-01-22T16:20:29+5:30
आबा कुटुंबीयांच्या बाजूने लागलेला प्रत्येक निकाल हा राजकीय विरोधकांकडून सहानुभूतीचा वारसा म्हणून हिणवला जात होता.
दत्ता पाटील
तासगाव : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांवर आकस्मिक राजकीय जबाबदारी पडली. आबा कुटुंबीयांच्या बाजूने लागलेला प्रत्येक निकाल हा राजकीय विरोधकांकडून सहानुभूतीचा वारसा म्हणून हिणवला जात होता.
मात्र, कवठेमहांकाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवल्याने त्याचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या नेतृत्वावर कर्तृत्वाची मोहोर उमटली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचा मार्ग सुकर झाला असून आबांचा राजकीय वारस राजकारणातही सरस ठरल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले आहे.
आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव बाजार समिती, तासगाव नगरपालिका, कवठेमहांकाळ नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि तासगाव, कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. अपवादवगळता सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळाले होते.
मात्र, हे यश वारसदारांचे नसून आबांच्या सहानुभूतीचे असल्याची टीका होत राहिली. यावेळी झालेली कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणुकीची धुरा पहिल्यांदाच आबांचे पुत्र रोहित पाटील यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. रोहित पाटलांच्या नेतृत्वाखाली पहिलीच निवडणूक होत असल्याचे तासगाव-कवठेमहांकाळसह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे केंद्रीत झाले होते.
निवडणुकीत रोहित पाटलांच्या पॅनेलची एकहाती सत्ता आली. एकीकडे सगळे दिग्गज विरोधात असताना रोहित पाटलांनी नगरपंचायतीची सत्ता मिळवून आबांच्या केवळ घराण्याचाच वारसा नसून राजकीय कर्तृत्वाचा वारसाही मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालाने रोहितच्या राजकीय कर्तृत्वावर यशस्वी मोहोर उमटली आहे.
परिणामी रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या निवडणुकांसाठीही राष्ट्रवादी सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळत असून कवठेमहांकाळच्या विजयाने रोहितची आगामी वाटचाल सुकर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मातब्बरांचे एकीकरणानंतरही पानिपत
कवठेमहांकाळची निवडणूक लक्षवेधी होण्यासाठी आणखी एक कारण होते. रोहित पाटलांच्या विरोधात खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, सगरे गटाच्या अनिता सगरे, गजानन कोठावळे असे अनेक मातब्बर एकत्रित आले होते. त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने लक्षवेधी झाली होती. मात्र, या निवडणुकीत या सर्व मातब्बरांचे पानिपत झाले.