सांगलीत घरात घुसून तलवारीच्या धाकाने सव्वा दोन लाखांचा ऐवज लुटला; मदतीसाठी आलेल्या तरुणावर दगडाने हल्ला
By शरद जाधव | Published: October 23, 2022 08:45 PM2022-10-23T20:45:37+5:302022-10-23T20:47:07+5:30
रविवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
सांगली: शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात घराचा मुख्य दरवाजा उचकटून आत प्रवेश करत महिलेस तलवार, कटावणी व चाकूचा धाक दाखवून दोन लाख २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात अला. याप्रकरणी दिप्ती प्रकाश माळी (रा. शर्वम बंगला, माळी कॉलनी, औद्याेगिक वसाहत, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रविवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेडिकल व्यवसायिक असलेल्या फिर्यादी माळी या माळी कॉलनीमध्ये कुटूंबियांसह राहण्यास आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास माळी कुटूंबिय झोपले असताना, चार संशयितांनी घराच्या गेटची कडी तोडून, घणाचा मुख्य दरवाजाची कडी उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुमच्या दरवाजावरती लाथा मारुन त्यांनी कडी तोडून आत प्रवेश केला. त्याठिकाणी झाेपलेल्या माळी यांना चौघांनी तलवार, कटावणी व चाकूचा धाक दाखवला व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील पाटल्या जबरदस्तीने काढून घेतल्या. चोरी करुन चोरटे बाहेर जात असतानाच, दिप्ती माळी यांचा भाऊ राजाराम माळी हे आवाज ऐकून मदतीसाठी आले. चोरट्यांनी त्यांनाही दगड मारुन जखमी करत तेथून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला आहे. ऐन दिवाळीत आणि घरात घुसून ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
सव्वा दोन लाखांवर डल्ला
चोरट्यांनी फिर्यादी दीप्ती माळी यांच्या दोन लाख रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या, २८ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र व ५०० रुपयांची रोकड चोरुन नेली आहे.