सांगली जिल्ह्यात कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रब्बी हंगामातील पिके वाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 06:46 PM2024-12-05T18:46:55+5:302024-12-05T18:47:39+5:30
विहिरीत पाणी असूनही उपयोग नाही : महावितरणकडून एकाच रोहित्रावर जादा कनेक्शनचा फटका
सांगली : शेत ओलितासाठी पदरमोड करून शेतकऱ्याने शेतात विहीर खोदली. अनामत रक्कम भरून वीज पुरवठाही घेतला. मात्र, कृषीपंपाला पुरेसा वीजपुरवठा नसल्याने रब्बी हंगामातील पिके वाळू लागली आहेत. यासंदर्भात वारंवार महावितरणला पत्रव्यवहार केला, निवेदने दिली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. पण, या सर्व योजनांपेक्षाही कृषीपंपाला पुरेसा वीज पुरवठा मिळाला तरी पुरेसे आहे, अशी शेतकऱ्यांची माफक मागणी आहे. महावितरणकडे अनामत रक्कम भरून वीज जोडणी घेतली. हजारो रुपये खर्च करून मोटरपंप आणि आवश्यक साहित्यही खरेदी केले. मात्र, देण्यात आलेल्या वीजजोडणीला पुरेसा वीजपुरवठाच राहात नसल्याने पाण्याची सोय असताना पिकांना पाणी मिळत नाही. याची तक्रार महावितरणकडे करण्यात आली होती, असे शेतकरी सांगत आहेत. त्यांनी अवैधपणे वीजपुरवठा घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करीत विजेची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, त्यानंतरही समस्या कायम आहे. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, तासगाव, मिरज, शिराळा, वाळवा तालुक्यात सर्वाधिक वीज पुरवठ्याची समस्या आहे. नवे रोहित्र बसविण्यात आले होते. त्यावर ३२ मोटारपंपांच्या वीज जोडण्या असल्याने समस्या जशीच्या तशीच आहे. यासंदर्भात त्यानंतर वारंवार तक्रारी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत उच्च दाबाने वीजपुरवठा करून समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी शेतकरी महादेव पाटील यांनी केली आहे.
काही फिडरवरच अडचणी
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महावितरणच्या काही फिडरवरच कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. याठिकाणी जादा विद्युत मोटारी असल्यामुळे अडचणी आहेत. येथे नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू आहे.
एकाच रोहित्रावर क्षमतेपेक्षा जादा विद्युत कनेक्शने दिली आहेत. यामुळे विहिरीत पाणी असूनही रब्बी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे पिके वाळत आहेत. मोटर चालू केली की लगेच बंद पडते. सर्व गोष्टींची महाविरतणच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे. -संभाजी माळी, शेतकरी.