मान्सून राज्यातून गेल्याने जत तालुक्यात रब्बी हंगाम धोक्यात-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:58 PM2018-10-09T23:58:42+5:302018-10-09T23:59:13+5:30
संपूर्ण राज्यातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवार, दि. ६ आॅक्टोबर रोजी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले, तर सोमवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी मान्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे.
बिळूर : संपूर्ण राज्यातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) शनिवार, दि. ६ आॅक्टोबर रोजी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले, तर सोमवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी मान्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे परतीच्या पावसाची आशा धुसर बनली असून, जत तालुक्यात रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. आधीच पिण्याच्या पाण्याची तीव्रता वाढली असून, त्यात आता आणखी भर पडणार आहे. प्रशासन पिण्याच्या पाण्याच्या टँकरला केराची टोपली दाखवत असतानाच, पाणी योजनाही ठप्प असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजना आताच सुरू करून जिल्ह्यातील तलाव पाण्याने भरून घेतल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातल्या आमदार-खासदारांनी याकडे अधिक लक्ष देऊन पाणी योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यायला हवी, अन्यथा जिल्ह्याला तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
शनिवारी मान्सूनने छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणाचा संपूर्ण भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, रायलसीमा आणि कर्नाटकच्या आणखी काही भागांतून माघार घेतली. यंदाच्या हंगामात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने २३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. जवळपास चार महिने मान्सूनचे राज्यात अस्तित्व होते. शुक्रवार, दि. ५ रोजी निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शनिवार, दि. ६ रोजी संपूर्ण राज्यातून मान्सून परतला आहे. मागील आठ वर्षांची मान्सूनची वाटचाल पाहता, यंदा मान्सूनने राज्यातून लवकर काढता पाय घेतला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१७ आणि २०११ मध्ये २४ आॅक्टोबर रोजी, २०१३ मध्ये २१ आॅक्टोबर, २०१२ व २०१५ मध्ये १५ आॅक्टोबर, २०१४ मध्ये १८ आॅक्टोबर, तर २०१६ मध्ये १६ आॅक्टोबर रोजी मान्सून महाराष्ट्रातून परतला होता.
मान्सून परतताच दुष्काळी जत तालुका आणि परिसरातील कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. ‘आॅक्टोबर हिट’ने लोक घामाघूम होऊ लागले आहेत. सायंकाळी गार वारे वाहायला सुरुवात झाली आहे.