रब्बी हंगामाला पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 08:37 PM2019-11-04T20:37:56+5:302019-11-04T20:38:40+5:30
सुरुवातीला शेतकरी समाधानी होता, मात्र तालुक्यात यंदा २००५ पेक्षाही जादा पाऊस पडल्याने वारणा व मोरणा या दोन्हीही नद्या नियंत्रण सीमा पार करून वाहिल्यामुळे नदीकाठची पिके पुराच्या पाण्याने वाहून गेली.
विकास शहा ।
शिराळा : परतीच्या पावसामुळे शेतात अजूनही पाणी आहे. यामुळे ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील रब्बी पेरण्या एक महिना लांबल्या आहेत. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे मशागत करता येणार नाही. याअगोदर अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला आहे आणि आता रब्बी हंगामही वाया जाण्याची शक्यता आहे. नुकसानीचे पंचनामे करावेत, तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
तालुक्यात जवळपास साडेसात हजार हेक्टरमध्ये रब्बी हंगामातील पेरण्या होतात. खरीप हंगामातील पिके काढून शेतकरी रब्बीत गहू, हरभरा, खपली, मका आदी पिकांच्या पेरण्या करतात. मात्र यंदा अतिपावसामुळे सध्या तरी पेरणीयोग्य चित्र नाही. शेतात अजूनही पाणी साठलेले आहे. खरीप हंगाम अगोदरच वाया गेला आहे. त्यातच आता रब्बी हंगामही पावसामुळे धोक्यात आला आहे.
तालुक्यात काढावयास आलेल्या पिकांपैकी ४० टक्के काढणी पूर्ण झाली असून ६० टक्के पिके अजूनही शेतामध्ये उभीच आहेत. तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या काळात पिकांना पोषक असा पाऊस पडला होता. परिणामी खरीप क्षेत्रामध्ये वाढही झाली होती. सुरुवातीला शेतकरी समाधानी होता, मात्र तालुक्यात यंदा २००५ पेक्षाही जादा पाऊस पडल्याने वारणा व मोरणा या दोन्हीही नद्या नियंत्रण सीमा पार करून वाहिल्यामुळे नदीकाठची पिके पुराच्या पाण्याने वाहून गेली.
पावसाने उघडीप दिल्यामुळे तालुक्यात खरीप हंगामात आगाप पेरणी झालेले सोयाबीन, भुईमूग, भात, मूग, चवाळी आदी पिकांच्या काढणीला गती आली आहे. मात्र उत्पादन कमी निघत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे.