रेबीज रोगाचे दहा वर्षांत समूळ उच्चाटन शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:31+5:302021-07-14T04:30:31+5:30
सांगली : रेबीज अत्यंत घातक आणि भीतीदायक असा हा विषाणूजन्य रोग हजारो वर्षांपासून सर्व जगाला घाबरवून टाकणारा रोग ...
सांगली : रेबीज अत्यंत घातक आणि भीतीदायक असा हा विषाणूजन्य रोग हजारो वर्षांपासून सर्व जगाला घाबरवून टाकणारा रोग आहे. याचे उच्चाटन आपल्याला २०३० पर्यंत करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय ढोके यांनी केले. ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फौंडेशन आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व पशुपालक आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विजय ढोके बोलत होते. कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्रादेशिक सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर होते.
विजय ढोके म्हणाले की, जगात मोठ्या प्रमाणात कुत्र्यापासूनच या रोगाचा प्रसार होतो. जगातील सर्वात गंभीर असा हा प्राणिजन्य आजार आहे. कुत्र्याबरोबरच मांजर, कोल्हे, वटवाघूळ यासह ज्या प्राण्यांना त्यांच्याकडून चावे होतात, ते सर्व या रोगामुळे संक्रमित होतात. जगात वर्षाला ७० हजार लोक या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. भारतात प्रतिवर्षी २० हजार लोकांना याची लागण होते आणि शेवट मृत्यू होतो. या रोगाच्या प्रतिबंधक लसीच्या संशोधनानंतर अमेरिकेने मानवातील मृत्यूचे प्रमाण प्रतिवर्षी दोनपर्यंत खाली आणले आहे. आपल्या देशातही लसीकरण केल्यानंतर रेबीज रोगाचे येत्या दहा वर्षांत सहज समूळ उच्चाटन करणे शक्य आहे.
डॉ. संतोष पंचपोर म्हणाले, रेबीजची लागण झाल्यावर मृत्यू हा ठरलेला आहे. रेबीज लस व इम्युनोग्लोब्युलीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनदेखील आजही आपण या रोगावर नियंत्रण मिळवू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी सर्व स्तरावर प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. एकूणच रेबीज या रोगाविषयी रोगउत्पत्ती, निदान, प्रतिबंध याविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. राज्यातील महानगरपालिका, मोठ्या नगरपालिकासुद्धा आजही कुत्र्यांच्या निर्बीजीकरण याबाबत किती उदासीन आहेत हे आपण पाहतो. आरोग्य विभागात रेबीज रोगाविषयी एकूणच उदासीनता ही काळजी वाढवणारी आहे.
ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटराव घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सचिन वंजारी यांनी आभार मानले.