कुत्रे चावलेय?, इंजेक्शन पाहिजे? आधी तुमचे गाव कोणते सांगा!
By संतोष भिसे | Published: July 16, 2024 05:09 PM2024-07-16T17:09:51+5:302024-07-16T17:11:06+5:30
मिरज : कुत्रे चावल्यास त्यावर तातडीने उपचार आवश्यक आहेत. मात्र, महापालिका क्षेत्रातील रहिवासी असाल, तरच रेबीजचे इंजेक्शन मिळेल असा ...
मिरज : कुत्रे चावल्यास त्यावर तातडीने उपचार आवश्यक आहेत. मात्र, महापालिका क्षेत्रातील रहिवासी असाल, तरच रेबीजचे इंजेक्शन मिळेल असा फंडा महापालिकेने सुरु केला आहे. या नियमामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. कुत्रे चावलेले अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहत आहेत.
कुत्रे चावल्यास रुग्णास सर्वप्रथम शासकीय रुग्णालयात पहिली दोन इंजेक्शन्स घ्यावी लागतात. नंतर आणखी चार किंवा पाच इंजेक्शन्सची गरज असते. महापालिका रुग्णालयात ती मिळतात. पण त्यासाठी रुग्णाचे आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखला अशा कागदपत्रांची रहिवासी पुरावा म्हणून मागणी केली जाते. यापैकी काही नसेल, तर आमदारांचे पत्र आणण्यास सांगितले जाते. ही कागदपत्रे किंवा पत्र मिळेपर्यंत इंजेक्शन दिले जात नाही. रुग्णाची हेळसांड होते.
मिरजेत कुत्रे चावलेल्या दोन वर्षांच्या बालकास घेऊन आलेल्या महिलेस परत पाठविण्यात आले. मुलगा स्थानिक रहिवासी नसल्याने इंजेक्शन नाकारण्यात आले. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयात तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांच्या अडवणुकीबद्दल जाब विचारण्यात आला. महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत तसा ठराव केल्याने अंमलबजावणी बंधनकारक असल्याचे सांगितले.
प्रथम मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
महापालिका क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची तातडीची गरज आहे. मात्र, त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही. तिन्ही शहरात फलक लावून भटक्या कुत्र्यांनी केवळ महापालिका क्षेत्रातील रहिवाशालाच चावा घ्यावा, अन्यथा प्रशासन जबाबदार राहणार नाही, अशा सूचनेचे फलक लावण्याची मागणी मोहन वाटवे यांनी प्रशासनाकडे केली आहे. रुग्णावर उपचारासाठी महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी करणारे अधिकारी इतर जनहिताच्या ठरावांच्या अंमलबजावणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
कुत्रा चावलेली व्यक्ती परगावातील, परराज्यातील असेल आणि त्याच्याकडे कागदपत्रे किंवा लोकप्रतिनिधीचे पत्र नसेल, तर त्याच्या जीवाशी महापालिका खेळ करीत आहे. मानवता आणि रुग्णसेवा या भावनेने प्रत्येक रुग्णावर उपचार झालेच पाहिजेत. हा अन्यायी ठराव तातडीने रद्द करावा. - मोहन वाटवे, जिल्हा सरचिटणीस, भाजप