सांगलीत बोगस बांधकाम परवान्यांचे रॅकेट
By Admin | Published: April 9, 2017 11:46 PM2017-04-09T23:46:29+5:302017-04-09T23:46:29+5:30
चौघांना अटक : घरमालकांविरुद्ध गुन्हे; महापालिका अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, शिक्क्याचाही वापर
सांगली : शहरात बोगस बांधकाम परवाने तयार करून त्या माध्यमातून कॉर्पोरेशन बँकेतून कर्ज घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी सध्या सहा घरमालकांविरुद्ध सांगली शहर, विश्रामबाग व संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील चौघांना अटक केली आहे. बोगस परवान्यांवर महापालिका अधिकाऱ्यांच्या हुबेहूब स्वाक्षऱ्या तसेच महापालिकेचे शिक्केही असल्याने, यामध्ये पालिकेतील कोणाचा सहभाग आहे का? याबद्दल गूढ निर्माण झाले आहे.
अटक केलेल्यांमध्ये अशोक भूपाल राजोबा (वय ३४, रा. शारदा हौसिंग सोसायटी, कुपवाड रस्ता, सांगली), झाकीर हुसेन मुजावर (३५, कुपवाड), राजकुमार शिवदास राठोड (३५, अभयनगर) व अमोल यमनाप्पा जैनावर (२८, शामरावनगर), चांदणी चौकातील अजित बाळू शिंदे व शामरावनगरमधील मोरम्मा श्रीशैल मानशेट्टी या महिलेविरुद्धही गुन्हा नोंद आहे. पण त्यांना अद्याप अटक केलेली नाही. अटकेतील संशयितांना रविवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये सांगलीतील शिवाजीनगर येथील कॉर्पोरेशन बँकेकडे संशयितांनी बांधकाम परवाने सादर करून घरबांधणीसाठी कर्जाची मागणी केली होती. यासंदर्भात बँकेने १६ सप्टेंबर २०१६ रोजी महापालिकेच्या नगररचना विभागास लेखी पत्र देऊन, संशयितांनी सादर केलेले बांधकाम परवाने खरे आहेत का? याची माहिती सादर करण्यास कळविले होते. नगररचना विभागाने या परवान्यांची चौकशी केली. परवान्यावर अधिकाऱ्यांची सही तसेच पालिकेचा परवाना दिलेली तारीख होती. पण रेकॉर्डला परवाना दिल्याबाबत संशयितांच्या नावांची नोंद नव्हती. यावरून हे सर्व परवाने बोगस असल्याचे उघडकीस आले. पालिकेने संशयितांना नोटिसा पाठवून खुलासा करण्याची मागणी केली होती. परंतु संशयितांनी कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे महापालिकेचे दिलीप कोळी, वैभव वाघमारे, शामराव गेजगे यांनी शहर, विश्रामबाग व संजयनगर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हे दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी चार संशयितांना तातडीने अटक केली. (प्रतिनिधी)
नगररचना विभागाचा हलगर्जीपणा
कॉर्पोरेशन बँकेने सप्टेंबर २०१६ ला पालिकेच्या नगररचना विभागास, संशयितांनी दाखल केलेल्या बांधकाम परवान्याची माहिती विचारली होती. मात्र त्यांनी तातडीने कोणतीही चौकशी केली नाही. एका सामाजिक संघटनेने याला वाचा फोडून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी एका रात्रीत धावाधाव करुन संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये नगररचना विभागाचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येतो. बांधकाम परवान्यासोबत बांधकाम व्यावसायिकाचा आराखडाही जोडलेला आहे. या आराखड्यावर बांधकाम व्यावसायिकाचे नाव व सही आहे. या व्यावसायिकालाही खुलासा करण्यासाठी पालिकेने नोटिसा पाठविल्या होत्या.
मिरजेतही गुन्हा दाखल
मिरज : महापालिकेचे बोगस बांधकाम प्रमाणपत्र तयार करून बँकेकडे कर्जाची मागणी केल्याप्रकरणी मिरजेतील गजानन गणपत सरवदे (रा. वेअर हाऊस मागे मिरज) यांच्याविरूध्द गांधी चौकी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन सरवदे यांनी घरावर कर्ज घेण्यासाठी कॉर्पोरेशन बँकेच्या सांगलीतील शिवाजीनगर शाखेत बांधकाम परवानगीचे पत्र जोडले होते.
बनावट नकाशे
संशयितांनी बांधकामाचा बनावट परवाना व नकाशे कुठे तयार केले, त्यासाठी लागणारा संगणक, प्रिंटर, शिक्के कोठून तयार केले, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, आणखी कोणाला हे बोगस परवाने दिले आहेत का, याचा तपास पोलिस करणार आहेत. या सर्व मुद्यांवर तपास करण्यासाठी संशयितांना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी त्यांनी न्यायालयास केली होती.