बनावट पीयुसी प्रमाणपत्रांचे रॅकेट, अपघातग्रस्त वाहन कळंबीत, विम्यासाठी अहमदनगरातून काढले प्रमाणपत्र
By संतोष भिसे | Published: March 5, 2024 04:37 PM2024-03-05T16:37:31+5:302024-03-05T16:37:54+5:30
अशी झाली हेराफेरी
सांगली : धूर तपासणी प्रमाणपत्रांमध्ये बोगसगिरी करणारी पीयुसी केंद्रे शोधून त्यांच्यावर कारवाईचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले होते, पण त्यानंतरही बोगसगिरी सुरुच असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून बोगस प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे कळंबी (ता. मिरज) येथील अपघातानंतर स्पष्ट झाले आहे.
कळंबी येथे शिरीष आमसिद्ध खंबाळे (वय २४, रा. भोसे, ता. मिरज) हा पोलिस भरतीची तयारी करणारा तरुण २५ फेब्रुवारीरोजी पीकअप जीपच्या धडकेत ठार झाला होता. विश्वजित मोहिते, प्रथमेश हराळे आणि प्रज्वल साळुंखे हे तरुण गंभीर जखमी झाले होते. रत्नागिरी - नागपूर महामार्गावर कळंबी गावाजवळ सकाळी आठ वाजता अपघात झाला. पंढरपूरकडून भरधाव वेगाने सांगलीकडे येणाऱ्या मालवाहू जीपने (एमएच १७ सीव्ही ०१४१) दोन दुचाकींना मागून धडक दिली होती.
या गाडीचे पीयुसी प्रमाणपत्र अद्यावत नव्हते. पोलिस पंचनाम्यावेळी हे प्रमाणपत्र दिले नाही, तर गुन्हा दाखल होऊ शकतो, विम्याची भरपाई मिळू शकत नाही हे वाहन मालकाच्या लक्षात आले. त्याने बोगसगिरी करुन तातडीने प्रमाणपत्र बनवले. अपघात मिरजेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर झाला होता. गाडी दिवसभर तेथेच थांबून होती. तरीही तिचे पीयुसी प्रमाणपत्र थेट अहमदनगर जिल्ह्यातील अकोला येथून काढण्याची करामत मालकाने केली. अपघाताच्या दिवशी दुपारी तीन वाजता हे प्रमाणपत्र निघाले आहे. त्यावर जीपचे छायाचित्रदेखील आहे.
मिरज ग्रामिण पोलिसांचेही दुर्लक्ष
ही गाडी अपघाताच्या ठिकाणाहून अकोल्याला अवघ्या सात तासांत कशी गेली? हा प्रश्न पोलिसांना पंचनाम्यावेळी पडल्याचे दिसून येत नाही. मिरज ग्रामिण पोलिसांनी प्रदूषण प्रमाणपत्र पाहिले, पण त्याचदिवशी ३५० किलोमीटर अंतरावरील अकोल्यातून पीयुसी प्रमाणपत्र कसे निघाले? याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.
अशी झाली हेराफेरी
गाडीच्या मालकाने नंबर प्लेटचे छायाचित्र मोबाईलवरुन अकोले येथील पीयुसी केंद्राला पाठविले. केंद्रचालकाने आरटीओच्या पोर्टलवर हेराफेरी करुन बोगस प्रमाणपत्र तयार केले. काही मिनिटांतच मालकाला मोबाईलवर पाठवले. त्याची प्रिंट काढून पंचनाम्यासाठी सादर करण्यात आली. ही हेराफेरी सर्वत्र सर्रास सुरु आहे. लोकमतने यासंदर्भात वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर परिवहन आयुक्तांनी बोगस पीयुसी केंद्रांना शोधून कारवाईचे आदेशही दिले होते, पण आरटीओ अधिकाऱ्यांनी हा आदेश फाट्यावर मारल्याचे स्पष्ट होत आहे.