सांगली मार्केट यार्डातील पोटभाडेकरू प्रशासनाच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:12+5:302021-01-03T04:27:12+5:30
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात शेती, शेतीपूरक व्यवसायांव्यतिरिक्त अन्य व्यवसायही जोरात आहेत. मार्केट यार्डात नुकतेच पोलिसांनी २० ...
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात शेती, शेतीपूरक व्यवसायांव्यतिरिक्त अन्य व्यवसायही जोरात आहेत. मार्केट यार्डात नुकतेच पोलिसांनी २० लाखांचा गुटखा जप्त केला. त्यामुळे पोटभाडेकरू आता रडारवर आले आहेत. मार्केट यार्ड ९९ एकर जागेवर वसले आहे. हे मार्केट यार्ड शेतीमालाची प्रमुख उतारपेठ आहे. हळद, गूळ, बेदाणा, मिरची, अन्नधान्य, कडधान्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. सध्या शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहारांसाठी जागा अपुरी पड़ू लागली आहे. मात्र शेतीशी काहीही संबंध नसणारे व्यवसाय मात्र फुलले आहेत. यार्डात शेतमालाची खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या काही अडते, खरेदीदार व्यापाऱ्यांना प्लॉट, गाळा मिळत नाही. मात्र शेतीशी संबंध नसणारे काही व्यवसाय तळ ठोकून आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे गोडावून, प्लास्टिक पत्रावळी, द्रोण, किराणा मालाची दुकाने, स्टेशनरी दुकाने, अगरबत्ती विक्री व अन्य काही व्यवसाय मार्केट यार्डातील काही गाळ्यांमध्ये सुरू आहेत.
गत आठवड्यात पोलिसांनी मार्केट यार्डात २० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. त्यामुळे मार्केट यार्डातील बेकायदा व्यवसाय, पोटभाडेकरुंचा विषय ऐरणीवर आला आहे. जप्त केलेला गुटखा मार्केट यार्डात गोदामात सापडला की रस्त्यावर, याबाबत खातरजमा करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने पोलिसांकडून पंचनामा अहवाल मागविला आहे. पंचनामा अहवालानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. मार्केट यार्डात गोदामात गुटखा सापडला असेल, तर संबंधित प्लॉटधारकाला नोटीस धाडून कारवाईची तयारी बाजार समितीने केली आहे.