आरग येथे आनंददायी शिक्षणासाठी राधिका देशपांडे यांची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:26+5:302021-09-24T04:30:26+5:30
लिंगनूर : मुलांचे शिक्षण आनंदी आणि प्रभावी होण्यासाठी आरग (ता. मिरज) येथे लेखिका, अभिनेत्री राधिका देशपांडे यांची कार्यशाळा झाली. ...
लिंगनूर : मुलांचे शिक्षण आनंदी आणि प्रभावी होण्यासाठी आरग (ता. मिरज) येथे लेखिका, अभिनेत्री राधिका देशपांडे यांची कार्यशाळा झाली. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) तर्फे उपक्रम आयोजित करण्यात आला.
दर महिन्याला होणाऱ्या परिषदेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शन घेतले जाते. त्यानुसार आरग केंद्रातील परिषदेत राधिका देशपांडे यांनी गोष्टीरूप अध्यापन या विषयावर रंजक मार्गदर्शन केले. शाळेत शिकविताना उदाहरणे व हावभावांचा उपयोग कसा करावा? हसतखेळत संस्कार कसे करावेत? त्यांची एकाग्रता कशी वाढवावी? अध्यापन आनंददायी आणि प्रभावी कसे होईल? याविषयी ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. शिक्षकांचे शंकासमाधानही केले.
या उपक्रमासाठी पुण्यातील सिंबोसोयासिस महाविद्यालयातील प्रा. डॉ. आशिष देशपांडे यांच्या गीता एज्युकेशन व सोशल फाउंडेशनने सहकार्य केले. मुख्याध्यापक हरिभाऊ गावड, ताई गवळी यांनी संयोजन केले. श्रीकांत थोरवे यांनी आभार मानले. कार्यशाळेत केंद्रप्रमुख शशिकांत माने यांच्यासह आरग केंद्रातील २४ प्राथमिक, माध्यमिक आणि खासगी शाळांमधील ९२ शिक्षक सहभागी झाले.