रॅगिंगप्रकरणी चौकशी अधिकारी नियुक्त
By admin | Published: December 10, 2014 12:11 AM2014-12-10T00:11:01+5:302014-12-10T00:15:41+5:30
पोलीसप्रमुखांची माहिती : मुलाची आत्महत्या ‘रॅगिंग’ला कंटाळूनच झाल्याची वडिलांची तक्रार
सांगली/पलूस : पलूस येथील केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सचिन लालासाहेब जावीर (वय १५, रा. गोमेवाडी, ता. आटपाडी) या दहावीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी तासगावच्या पोलीस उपअधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिली.
दरम्यान, सचिनने ‘रॅगिंग’ला कंटाळूनच आत्महत्या केली असल्याची तक्रार त्याचे वडील लालासाहेब जावीर यांनी आज, मंगळवारी पलूस पोलिसांत केली. मात्र पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्याची कोणतीही कार्यवाही सुरु झालेली नाही.
सचिन जावीर याने गेल्या आठवड्यात विद्यालयाच्या आवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी विद्यालय व्यवस्थापनाने, सचिनची अभ्यासात प्रगती नव्हती, त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर सचिनच्या वडिलांनी, माझ्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. या सर्व घडामोडींचा पोलीसप्रमुख सावंत यांनी आज, मंगळवारी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तासगावचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, आज विद्यालयात पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विद्यालयाचे प्राचार्य अशोक साळी म्हणाले की, सचिनने रॅगिंगमुळे आत्महत्या केली नाही. त्याची अभ्यासात प्रगती नव्हती, यातूनच त्याने आत्महत्या केली आहे. मला प्राचार्य पदाचा कार्यभार घेऊन केवळ दीड वर्ष झाले आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सचिनची अभ्यासात प्रगती नव्हती. त्यामुळे त्याने हे कृत्य केले आहे. विद्यार्थी व पालकांनी संयम राखावा. (प्रतिनिधी/वार्ताहर)
समुपदेशकाची नियुक्ती करावी
पालक मेळाव्यात पालकांनी सांगितले की, नवोदय विद्यालयात येणारी मुले घरातील सर्वांना सोडून येतात. त्यांची मन:स्थिती सांभाळणे गरजेचे आहे. यासाठी विद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करावी. याबाबत तातडीने अंमलबजावणी केल्यास भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही.
शाळा, महाविद्यालयात होतेय घुसमट !
जिल्ह्यात महाविद्यालयातील तरुणांनी ‘रॅगिंग’च्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत आणि आजही घडत आहेत. आता हे प्रकार शाळांमध्येही सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. /हॅलो १