रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेमध्ये फूट
By Admin | Published: August 26, 2016 10:48 PM2016-08-26T22:48:02+5:302016-08-26T23:18:31+5:30
पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोड्या : प्रदीप पाटील यांचा सवतासुभा; नेत्यांच्या वादात शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडण्याची भीती
सांगली : शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील गटात पुन्हा फूट पडणार असून, माजी खासदार शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त दि. २ सप्टेंबरला युवा आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सांगलीत शेतकरी मेळावा आयोजित केला असून, यास रघुनाथदादा पाटील यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलले आहे.
शरद जोशी यांनी १९७८ मध्ये चाकण येथे पहिले कांदा आंदोलन केले. त्यानंतर १९८० मध्ये कांदा आणि ऊस उत्पादकांचे संयुक्त आंदोलन त्यांनी उभारले. त्यावेळी सांगली जिल्ह्यात ऊस उत्पादकांची साखर कारखानदारांकडून पिळवणूक सुरू होती. शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अस्वस्थ होता. तो अन्यायाविरोधात पेटून उठत होता. पण, नेतृत्व नसल्यामुळे कोणीच रस्त्यावर येत नव्हते. मौजे डिग्रज येथील जयपाल फराटे यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेठाण गावाला भेट देऊन, शरद जोशी यांच्याशी शेतीप्रश्नावर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व करावे, अशी गळ त्यांनी जोशी यांना घातली. त्यानुसार जोशी यांनी १९८१ मध्ये मौजे डिग्रजला भेट दिली. ऊसदराच्या प्रश्नावर चर्चा करून आंदोलन छेडण्याचे ठरले. तेव्हापासून आजअखेर जोशींच्या शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रभाव राहिला आहे. शेतकरी संघटनेने आवाहन केल्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरतो, याची साखर कारखानदार आणि व्यापारी, जिल्हा प्रशासनाला जाण आहे.
शरद जोशी यांच्या हयातीतच संघटनेत उभी फूट पडून राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली होती. अलीकडेच रघुनाथदादा पाटील यांनी सवतासुभा मांडला होता. त्यातून जोशीप्रणित शेतकरी संघटना आणि रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना, असे दोन गट पडले. जोशी यांनी अनेकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या मनोमीलनाचा प्रयत्न केला होता. पण, तो अयशस्वी झाला होता. आता रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेत पुन्हा आणखी फूट पडल्याचे दिसत आहे.
रघुनाथदादांच्या गटाच्या शेतकरी संघटना युवा आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दि. २ सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मणराव वडले, शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकरराव गोडसे, किसान पुत्र आंदोलनचे मार्गदर्शक अमर हबीब अशा दिग्गज शेतकरी नेत्यांना निमंत्रित केले आहे. शिवाय जोशीप्रणित शेतकरी संघटना आणि रघुनाथदादा पाटीलप्रणित शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही बोलाविले आहे.
शेतकरी मेळाव्याचे भित्तीपत्रक काढले असून त्यावर दोन्ही संघटनेतील नेते व कार्यकर्त्यांचा उल्लेख आहे. या भित्तीपत्रकावर रघुनाथदादा पाटील यांच्या नावाचा उल्लेखही नाही. शिवाय, जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावेही दिसत नाहीत.
मेळाव्यात ऊस दराच्या महत्त्वाच्या प्रश्नावर मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असेल, तर रघुनाथदादा पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांना का डावलले, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. शेतकरी संघटनेचा बिल्ला आणि जोशी यांचे छायाचित्र मात्र भित्तीपत्रकावर आहे. याचाच अर्थ शेतकरी संघटनेमध्ये फूट पडून तिसरा गट निर्माण झाल्याचे उघड दिसत आहे.
प्रदीप पाटील यांनी रघुनाथदादा पाटील आणि युवा आघाडीचे संजय कोले यांना शह देण्यासाठी शेतकरी संघटनेतील नाराज नेत्यांना संघटित केल्याचे दिसत आहे. ‘चाबूकफोड’ आंदोलन महाराष्ट्रभर गाजविणारे बाळासाहेब कुलकर्णी यांनाही त्यांनी बरोबर घेतले आहे. कुलकर्णी यांची स्वच्छ प्रतिमा असल्याचा प्रदीप पाटील यांना फायदा होणार आहे. आता ‘स्वाभिमानी’सह शेतकरी संघटनांची संख्या चार झाली आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडून श्रेयवादाचेच राजकारण शेतकरी संघटनांमध्ये रंगणार की काय, अशी भीतीही उपस्थित होत आहे. कार्यकर्त्यांची अवस्था मात्र ‘जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो... साचले मोहाचे धुके घनदाट हो... आपली माणसं आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती... विठ्ठला... कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी झाली आहे.
प्रदीप पाटील यांची संघटनेतून हकालपट्टी
शेतकरी संघटनेतून प्रदीप पाटील यांची हकालपट्टी केली आहे. आमच्या संघटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. यामुळे भित्तीपत्रकावर माझे छायाचित्र आणि नाव छापण्याचा संबंधच येत नाही. याशिवाय, त्यांनी जे भित्तीपत्रकावर काही आमच्या कार्यकर्त्यांची नावे छापली आहेत. यापैकी काहीजणाशी मी दूरध्वनीवरून संपर्क केला आहे. या कार्यकर्त्यांनी आम्हाला न सांगताच त्यांनी नावे छापली असून त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.