..तरच शेतकरी वाचणार; केंद्र, राज्य सरकारवर रघुनाथदादा पाटील यांचे टीकास्त्र
By अशोक डोंबाळे | Published: August 4, 2023 07:03 PM2023-08-04T19:03:31+5:302023-08-04T19:05:00+5:30
इस्लामपुरात ९ ऑगस्टला चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा
सांगली : ऊस, दूध आणि शेतमालाच्या भावात पिळवणूक होत असल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट वाढले आहे. ‘इंडिया’विरुद्ध ‘भारत’ ही लढाई मागील ७० वर्षांपासून सुरू असली तरी त्यामध्ये शेतकऱ्यांचा पराभव झाला आहे. आता केंद्र आणि राज्यातील सरकार हाकलले तरच शेतकरी वाचतील, अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. इस्लामपूर येथे दि. ९ ऑगस्ट रोजी शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी आपकी बार किसान सरकार आणण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, २०१३ मध्ये तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर इतर राज्यांप्रमाणे तेलंगणा राज्यातही शेतकरी आत्महत्या सुरू होत्या. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून के. चंद्रशेखर राव यांनी धोरण राबवायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी शेतीला पाणी, मोफत वीज देण्याचा धाडसी निर्णय घेतला. खरीप आणि रब्बी हंगामात पेरणीपूर्व एकरी १० हजार रुपये थेट रोख मदत शेतकऱ्यांना केली. नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकरकमी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले. परिणामी, तेलंगणा राज्यावरील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसला गेला.
मराठवाड्याचे माजी महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलेल्या अहवालात सुमारे एक लाख शेतकरी आत्महत्येच्या विचाराने ग्रासले असल्याचे नमूद केले. त्यांनी तेलंगणा सरकारप्रमाणे एकरी १० हजार रुपये मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारला शिफारस केली. मात्र, सरकारने ही शिफारस धुडकावून लावली आहे. शेतकरी विरोधी काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे.
मागील ७५ वर्षांत आमदार, खासदारांनी राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशाला शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी इस्लामपुरात ९ ऑगस्ट रोजी चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी बी. जी. पाटील, महिला संघटनेच्या वंदना माळी, शर्वरी पवार उपस्थित होत्या.