कलेला दाद; चिमणीचं घरटं तारेचं..पाच हजाराच्या मोलाचं, सांगलीतील प्रदर्शनातून आलं अर्थभान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 01:17 PM2022-01-03T13:17:52+5:302022-01-03T13:18:07+5:30
सांगली : काट्याकुट्यांनी चिमणी (सुगरण) तिचं घरटं साकारते. तिच्या कलेचे कौतुक मानवाला नेहमीच वाटत आले आहे. सांगलीच्या कलाकाराने याच ...
सांगली : काट्याकुट्यांनी चिमणी (सुगरण) तिचं घरटं साकारते. तिच्या कलेचे कौतुक मानवाला नेहमीच वाटत आले आहे. सांगलीच्या कलाकाराने याच चिमणीच्या घरट्याला चक्क तारांच्या सहाय्याने साकारले. कलारसिकांनी त्याचे कौतुकच तर केलेच पण, पाच हजार रुपयांमध्ये घरटे खरेदी करुन त्याच्या कलेचा सन्मानही केला.
निसर्गाच्या जवळ जाते ती कला प्रत्येकाला भावतेच, पण यासोबत ती बरेच काही देऊनही जाते. राहूल बाबर याने तारेपासून तयार केलेले घरटे तब्बल पाच हजार रुपयाला विकले गेले.
कलाविश्व महाविद्यालयामध्ये विविध वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात तयार केलेल्या चित्र आणि शिल्पांमधून अगदी निवडक कलाकृतींचे प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात आले होते. राहूल शहाजी बाबर हा इंटरमिजिएट शिल्पकलेचा विद्यार्थी. सांगोला तालूक्यातील चोपडी गावचा राहूल शिक्षणासाठी सांगलीत आला. शिल्पकलेत काही वेगळे काम करण्याचा प्रयत्न करीत राहिला.
घरटे पुर्ण करायला लागले पंधरा दिवस
या प्रदर्शनात त्याने तारेपासून तयार केलेले चिमणीचे घरटे सादर केले. ते पूर्ण करायला त्याला पंधरा दिवस लागले. जवळपास अडीच फुटाचे हे तारेपासून तयार केलेले अप्रतिम घरटे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी पाच हजार रुपयाला विकत घेतले आणि कलेतून करियरसोबत कमाईसुध्दा करता येते याचा अनुभव राहूल याला आला.