अंटार्क्टिका मोहिमेत कांदे येथील राहुल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:42+5:302021-01-25T04:26:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : यंदा भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेसाठी ४३ अभियंते व शास्त्रज्ञांचे पथक रवाना झाले आहे. यामध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : यंदा भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेसाठी ४३ अभियंते व शास्त्रज्ञांचे पथक रवाना झाले आहे. यामध्ये कांदे (ता. शिराळा) येथील अभियंता राहुल शिवाजीराव पाटील यांचाही समावेश आहे. ही त्यांची दुसरी अंटार्क्टिका मोहीम आहे.
राहुल पाटील यांचे प्रथामिक व माध्यमिक शिक्षण कांदे, तर महाविद्यालयीन शिक्षक इस्लामपूर येथे झाले. ते इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशनमध्ये पदविका उत्तीर्ण झाले असून सध्या पुणे येथील खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीमार्फत त्याचा या मोहिमेत समावेश झाला आहे. त्याचे वडील निवृत्त स्थापत्य अभियंता आहेत.
अंटार्क्टिकाची ओळख एक सफेद खंड अशी आहे. येथे बाराही महिने बर्फ पसरलेला असतो. ३ ते ४ महिने दिवस व उरलेल्या काळात रात्र असते. उत्तर व ईशान्य भारतात जितकी थंडी असते, त्याच्या अनेक पटीने अंटार्क्टिकावर थंडी असते. भारताने अंटार्क्टिका करारावर स्वाक्षरी करून १९९१ मध्ये आपल्या संशोधनकार्यास सुरुवात केली. त्यानंतर भारत सरकार प्रत्येक वर्षी ही मोहीम आयोजित करीत आहे.
या दौऱ्यात सध्या अंटार्क्टिकावर भारताची ‘मैत्री’ व ‘भारती’ अशी दोन संशोधन केंद्र कार्यरत आहेत. या मोहिमेतील अभियंता व शास्त्रज्ञ गोवा येथील मुरगाव बंदरातून जहाजाने दक्षिण आफ्रिकामार्गे अंटार्क्टिकाला रवाना झाले आहेत. यामध्ये कांदे येथील राहुल पाटील यांचा समावेश असल्याने सांगली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.
फोटो-२३राहुल पाटील