राहुलला करायचंय सीमोल्लंघन... पण आर्थिक अडथळ्याच्या शर्यतीने हुकली न्यूझीलंडची संधी
By हणमंत पाटील | Published: October 24, 2023 12:29 PM2023-10-24T12:29:53+5:302023-10-24T12:31:06+5:30
देशांतर्गत अनेक ॲथलेटिक स्पर्धांत चमकदार कामगिरी
हणमंत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : देशांतर्गत तीन राज्यांतील ॲथलेटिक स्पर्धा त्याने जिंकल्या. गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन - २०२३ या स्पर्धेत त्यांने ३५ ते ३९ च्या वयोगटात पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे राहुल शिरसट यांची न्यूझीलंड स्पर्धेसाठी निवड जाहीर झाली. परदेशात सीमोल्लंघन करण्याची इच्छा, तयारी व पात्रता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे राहुलची संधी हुकली.
राहुलचे वडील सुबराव शिरसट हे विटा (जि. सांगली) येथील हातमाग व्यवसायात कामगार म्हणून काम करीत होते. तर, आई विटा नगरपालिकेच्या घुमटमाळ शाळा क्रमांक ७ येथे बालवाडीत सेविका होती. त्यामुळे पूर्वीपासूनच कुटुंबाची अर्थिक परिस्थिती बेताची असल्याने राहुलला लहानपणापासून गरिबीचे चटके बसले. मात्र, हार न मानता त्याने विट्यातील एका लॅबमध्ये रात्रपाळीत काम करून दिवसा महाविद्यालायात जाऊन बीएस्सी पदवी मिळविली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे एका लॅबोरेटरीमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम सुरू केले. मात्र, त्याच्यातील खिलाडू वृत्ती त्याने संपू दिली नाही.
मॅरेथॉनच्या माध्यमातून त्याने सांगली, कोल्हापूर, इंचलकरंजी अशा विविध स्पर्धेत पदके मिळविली. त्यानंतर कर्नाटकमधील बेळगाव येथे ट्रायप्लॉन व सुपरबाइज या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. गोवा येथे आयर्नमॅन २०२३ ची स्पर्धा नुकतीच झाली. त्यामध्ये राहुलने त्याच्या वयोगटात प्रथम क्रमांक मिळवित आयर्नमन होण्यात यश मिळविले. त्यानंतर न्यूझीलंडसाठी त्याची निवड जाहीर करण्यात आली. मात्र, त्यासाठी साधारण चार लाखांपर्यंत खर्च असल्याने त्याने नकार कळविला. परंतु, अर्थिक परिस्थितीपुढे हार न मानता त्याचे प्रयत्न सुरुच आहेत.
अजूनही जिद्द सोडली नाय...
गोव्यातील स्पर्धेत यश मिळाल्याने माझी निवड न्यूझीलंडसाठी जाहीर झाली. माझी अर्थिक परिस्थिती नसल्याने मी लगेच नकार कळविला. त्यामुळे उपविजेत्या स्पर्धाकाला ती संधी मिळाली. परंतु, मी जिद्द सोडलेली नाही. पुढील सहा महिन्यांत कझाकिस्तान येथे ‘फुल आयर्नमॅन’ ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी एका बाजूला सराव आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक परिस्थिती सुधारणे अशा दोन्ही आघाड्यांवर लढत आहे, असे राहुलने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कर्जाने घेतली सायकल
राहुलने आयर्नमॅन स्पर्धेसाठी २ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर धावण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण केले. त्यासाठी सातारा येथील एका डॉक्टरकडून सेकंड हॅण्ड सायकल घेण्यासाठी कर्ज घेतले. आता कझाकिस्तान येथील ‘फुल आयर्नमॅन’ स्पर्धा जिंकण्यासाठी त्याच्या जिद्दीच्या पंखाला आर्थिक बळाची आवश्यकता आहे.