बामणोलीत बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; पाच परप्रांतियांना अटक; २० लाखाचा मुद्देमाल जप्त
By घनशाम नवाथे | Published: April 13, 2024 11:18 PM2024-04-13T23:18:30+5:302024-04-13T23:18:45+5:30
एलसीबीची कारवाई
घनशाम नवाथे
सांगली : कुपवाडजवळील बामणोली येथे बनावट गुटखा ‘पॅकेजिंग’ करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी छापा मारला. यावेळी दोन अल्पवयीन युवकांसह सात परप्रांतिय कामगारांना ताब्यात घेतले. कारवाईत सुगंधी तंबाखू, सुपारी, पॅकेजिंग मशिन, पॅकिंग पेपर, पॅकिंग बॉक्स असा २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत कारखान्यात काम करणारे योगेंदर रामब्रिज सिंह (वय ३०), द्रुक गंगा सिंह (वय २४), मोनू रामबहादूर सिंह (वय ३०), हरिओम पुन्ना सिंह (वय ४५), देव बमर सिंह (वय २२, सर्व रा. सिकंदरा, आग्रा, राज्य उत्तरप्रदेश) यांना अटक केली. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. हा कारखाना शहानवाज पठाण (रा. अहिल्यानगर, कुपवाड) याच्या मालकीचा असल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू, गुटखा, पानमसाला विक्री व उत्पादनावर बंदी आहे. परंतू येथील मागणी लक्षात घेऊन बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये बनावट गुटखा पॅकेजिंगचा कारखाना काही दिवसापासून सुरू करण्यात आला. याची स्थानिक लोकांना माहिती होऊ नये म्हणून परप्रांतिय कामगारांना आणले होते. बेमालूमपणे सुरू असलेल्या कारखान्याबाबत पोलिस हवालदार दीपक गायकवाड व कपिल साळुंखे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने खात्री केली. त्यानंतर संशयावरून सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने कारखान्यावर छापा मारला.
पोलिस पथकाला कारवाईत सुगंधी तंबाखू, गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, पॅकिंग मशिनरी मिळून आल्या. तेथे काम करणाऱ्या सातजणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. कामगार योगेंदर सिंह याने हा कारखाना शहानवाज पठाण चालवत असल्याचे सांगितले. पोलिसांनी एकुण १९ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार यांच्या उपस्थितीत जप्त केला.
अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषधचे सहायक आयुक्त निलेश मसारे, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील, सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, उपनिरीक्षक विश्वजीत गाढवे, राजेंद्र नलावडे, कर्मचारी नागेश कांबळे, इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे, अमर नरळे, दरीबा बंडगर, सुनिल जाधव, विनायक सुतार, सूरज थोरात, अभिजीत ठाणेकर व कुपवाड पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.
बनावट व अन्य कंपनीच्या नावाने गुटखा-
कारवाईत १२ लाख ७६ हजाराची सुगंधी तंबाखू, ३ लाखाचे पॅकिंग मशिन, १ लाख ८० हजाराची गुटखा सुपारी, २४ हजाराची सुगंधी तंबाखू, ८३ हजाराचा एका कंपनीच्या नावाचा गुटखा, ६० हजाराचे पॅकिंग पेपर बंडल, ५२ हजार ६०० रूपयाचे पॅकिंग बॉक्स असा मुद्देमाल जप्त केला. बनावट नावाने तसेच काही कंपनीच्या नावाने बनावट गुटखा बनवला जात असल्याची माहिती तपासात पुढे आली.