‘गोवा मेड’बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा, सात जणांवर गुन्हा; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By घनशाम नवाथे | Published: August 17, 2024 07:29 PM2024-08-17T19:29:16+5:302024-08-17T19:30:15+5:30

विजयनगरमध्ये भरारी पथकाची कारवाई

Raid on Goa Made fake liquor factory in sangli case against seven persons | ‘गोवा मेड’बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा, सात जणांवर गुन्हा; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

‘गोवा मेड’बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा, सात जणांवर गुन्हा; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : गोवा राज्यातच विक्रीसाठी परवानगी असलेल्या दारूची तस्करी करून महाराष्ट्रातील कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने उघडकीस आणला. पथकाने विजयनगर चौकात तिघांना दारूची तस्करी करताना पकडून नंतर परिसरातील फ्लॅटवर छापा मारला. फ्लॅटमधील छोटेखानी कारखान्यात बनावट झाकणे लावून दारू सीलबंद करण्यात येत होती.

भरारी पथकाच्या कारवाईत अब्दुलरझाक नजरूद्दीन मुलाणी (वय २६, रा. जमगे गल्ली, कवठेमहांकाळ), महंमदकैफ बशीर बागवान (वय २०, रा. थबडेवाडी रस्ता, कवठेमहांकाळ), सिद्दीक मुबारक नदाफ (वय १८, रा. दादा चौक, कवठेमहांकाळ) या तिघांना अटक करण्यात आली. तपासात पुरवठादार व ग्राहक अशा चौघांवरही कारवाई केली. एकूण १० लाख २९ हजारांचा मुद्देमाल कारवाईत जप्त केला.

पथकाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला विजयनगर चौकातील सत्राळकर स्क्वेअर इमारतीच्या पूर्वेला गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मोटार क्रमांक (एमएच १३, सीएस ७९५) थांबवली. मोटारीची तपासणी केली असता, त्यात विदेशी दारूचे २१ बॉक्स आढळले. मोटार तसेच दुचाकी क्रमांक (एमएच १०, ईएच १५०१) असा मुद्देमाल जप्त केला. तिघांच्या चौकशीत हा दारूसाठा विजयनगर येथील शिवदत्त आनंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भरला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तेथे छापा टाकला, तेव्हा गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या दारूची तस्करी करून येथे आणली जात असल्याची माहिती मिळाली.

गोव्यातील दारू महाराष्ट्रात दारू विक्रीची परवानगी असलेल्या कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून त्यावर बनावट झाकणे व सील लावले होते. त्यानंतर या दारूची परिसरातील हॉटेल, ढाब्यांवर बेकायदेशीरपणे विक्री केली जात होती. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात दारूसाठा, बनावट झाकणे, सील, रिकाम्या बाटल्या व इतर साहित्य असा ८ लाख ८३ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी तिघांना अटक करून पोलिस कोठडी घेतली. त्यानंतर तपासात त्यांनी पुरवठा केलेल्या काही हॉटेल्स, ढाब्यांवरून दारूसाठा जप्त केला. बनावट झाकणे, सील करण्यास जागा देणारा मालक, पुरवठादार, ग्राहक अशा आणखी चौघांवरही कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ६३० रुपयाचा दारूसाठा जप्त केला. एकूण ७ जणांवर कारवाई करून १० लाख २९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक राजकुमार खंडागळे, अजितकुमार नायकुडे, विनायक जगताप, दुय्यम निरीक्षक युवराज कांबळे, सुवास पोळ, रमेश चंदुरे, शरद केंगारे, सहायक दुय्यम निरीक्षक स्वप्निल कांबळे, आनंदमूर्ती भिसे तसेच वैभव पवार, स्वप्निल आटपाडकर, प्रकाश माने, शाहीन शेख यांनी कारवाई केली.

हॉटेल्स, ढाब्यांवर बेकायदा विक्री

उत्पादन शुल्कने बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा मारल्यानंतर येथील दारू ही हॉटेल्स, ढाब्यांवर विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गोवा मेड दारूची राजरोस विक्री होत असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Raid on Goa Made fake liquor factory in sangli case against seven persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.