सांगलीत कुंटणखान्यावर छापा, चौघेजण ताब्यात; पिडीत महिलेची सुटका
By शीतल पाटील | Published: October 30, 2023 07:23 PM2023-10-30T19:23:17+5:302023-10-30T19:23:37+5:30
सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथील कापसे प्लाॅट परिसरातील कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी कुंटणखाना ...
सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथील कापसे प्लाॅट परिसरातील कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी कुंटणखाना चालविणाऱ्या एक महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच परजिल्ह्यातील पिडीत महिलेचीही सुटका केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियंका बाबर यांना कुपवाड येथील कापसे प्लाॅट येथे एका महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती मिळाली.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटणखान्यात बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर एलसीबी व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकला. पिडीत महिलेची चौकशी केली असता तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले.
पथकाने कुंटणखाना चालविणारे दलाल रेखा पाडूंरंग मोटे (वय ४०), सिद्धार्थ पांडूरंग मोटे (२०, दोघेही, रा. लोकूर मळा, कापसे प्लाॅट, कुपवाड), एजंट रोहन उर्फ शुभम शशिकांत वाघमोडे (२०, रा. बामनोळी), मोसमीन बशीर अंबी (३०, रा. श्रीमंत काॅलनी, आंबा चौक, कुपवाड) या चौघांना ताब्यात घेतले. चौघाविरूद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.