जिल्ह्यात पुन्हा वाळूसाठ्यांवर छापे; पावणेचार कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:14 AM2017-09-11T00:14:18+5:302017-09-11T00:14:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जत/आटपाडी/कवठेमहांकाळ : महसूल विभागाने रविवारी पुन्हा बेकायदेशीर वाळूसाठ्यांवर छापा टाकून तस्करांवर कारवाई केली. जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ येथे झालेल्या कारवाईत एकूण ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाईने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जत तालुक्यातील संख, खंडनाळ, करजगी व हळ्ळी बोर नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून साठा केलेली सुमारे ४४६ ब्रास वाळू महसूल विभागाने जप्त केली आहे. याप्रकरणी २७ वाळू तस्करांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ कोटी ११ लाख ३१ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तीन ते दहा सप्टेंबरअखेर ही कारवाई करण्यात आली आहे.
हळ्ळी गावात ९४ ब्रास वाळू साठा जप्त करून जंगाप्पा सातपुते, चंदू कोळी, बसवराज पाटील, राजकुमार सातपुते, अरविंद खवेकर, संपत खवेकर, राजू मुदीमणी (सर्व, रा. हळ्ळी) या सातजणांना नोटीस देण्यात आली आहे. करजगी गावात ६४ ब्रास वाळू साठा जप्त करून जयवंत कलबुर्गी, शाबू पट्टणशेट्टी, निंगाप्पा जेऊर, महादेव पट्टणशेट्टी, अशोक दळवाई, सुरेश रवी सर्व (सर्व रा. करजगी) या सहाजणांना नोटीस देण्यात आली आहे. संख व खंडनाळ परिसरात २८८ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. विठ्ठल लोहार, हणमंत पाटील, अंबू बसर्गी, श्रीशैल कलादगी, शांतू गुजरे, अनिल बिराजदार (सर्व रा. संख) व श्रीशैल वज्रशेट्टी, सुरेश पाटील, तम्मा कुलाळ, दत्ता पाटील, भारत टेंगले, सुरेश मोटे, विठ्ठल सरजे व वाघोली (पूर्ण नाव नाही) सर्व रा. खंडनाळ या चौदाजणांना नोटीस देण्यात आली आहे.
जत परिसरात सुरू असलेल्या बांधकामांची चौकशी करून ३२५ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. याप्रकरणी २० ते २५ जणांना नोटिसा दिल्या आहेत. पाच गावातील एकूण ७७१ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. त्यापैकी काही वाळूचा लिलाव करून सहा लाख ९२ रुपयाचा महसूल शासकीय तिजोरीत जमा केला आहे. या कारवाईत प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार अभिजित पाटील, नायब तहसीलदार ए. बी. भस्मे, मंडल अधिकारी नंदकुमार बुकटे, अरुण कणसे व गाव कामगार तलाठी आर. एच. कोरवार, गणेश पवार, विशाल उदगिरे यांनी भाग घेतला होता.
रविवारी दिवसभर तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी आणि तलाठी यांना एकत्रित करुन आटपाडीतील २८ बांधकामांचे पंचनामे केले. याठिकाणी १ कोटी १ लाख १० हजार ९६० रुपये दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
बोंबेवाडी येथे शुक्रवारी रात्री वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर आठ वाळू तस्करांनी हल्ला केला. त्यामध्ये सुरेश किसन शेळके (पुरवठा विभाग-अव्वल कारकून) आणि लिपिक संजय सोनुले हे दोन कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन लंगुटे यांनी रविवारी आटपाडीतील सर्व सुरु असलेल्या बांधकामांचे पंचनामे केले. त्यासाठी तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी आणि गावकामगार तलाठी यांना एकत्र करण्यात आले. दिघंची रस्ता ते निंबवडे रस्त्याच्या उत्तरेकडील एक भाग, दिघंची रस्ता ते सांगोला चौकापर्यंत पूर्वेकडील एक भाग आणि उर्वरित बसस्थानक परिसर असे तीन विभाग करुन, सर्व सुरु असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी जाऊन पंचनामे करण्यात आले.
बांधकामांच्या ठिकाणी असलेल्या वाळूसाठ्याचे पंचनामे पथकाने केले. एका ब्रासला २७१८० रुपये एवढा दंड करण्यात येणार आहे. या कारवाईत मंडल अधिकारी ए. बी. साळुंखे, तलाठी माणिकराव देशमुख, वसंत पाटील, जीवन माने, व्ही. आर. कोळी, एस. एस. कारंडे, एम. एन. पाटोळे, एस. आर. तांबोळी, व्ही. आर. जाधव, एन. आर. पाटील, एस. एस. महाजन, पी. एन. आडसुळे, पी. एस. वायदंडे, आर. एस. वीर, एस. बी. चिप्रे, के. एस. भिंगारदेवे, यु. व्ही. जानकर, एस. एच. केंगार, डी. एम. क्षीरसागर, आर. एस. कांबळे, यू. बी. बोथिंगे, व्ही. बी. पाटील, जे. एन. माने यांनी सहभाग घेतला.
महसूल कर्मचाºयांचे काम बंद
महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी संघटना यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवेदन दिले. त्यामध्ये शुक्रवारी महसूल कर्मचाºयांना मारहाण करण्याºया वाळू तस्करांना अटक होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार आरोपींना अटक केली नाही, तर सोमवारपासून सर्व महसूल कर्मचारी आणि तलाठी काम बंद करणार आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार बी. एम. सवदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.