सांगली, माधवनगरला पेट्रोल पंपांवर छापे
By admin | Published: July 17, 2017 12:10 AM2017-07-17T00:10:35+5:302017-07-17T00:10:35+5:30
सांगली, माधवनगरला पेट्रोल पंपांवर छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मापात माप करणाऱ्या संशयित पेट्रोल पंपांवर छापे टाकण्याची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची सांगली जिल्ह्यातील कारवाई अद्याप सुरूच आहे.
पथकाने रविवारी दुपारी माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याचा पेट्रोलपंप व माधवनगर जकात नाक्याजवळील सदाशिव पेट्रोलियम या दोन पंपांवर छापे टाकून तीन तास तपासणी केली. पण तिथे आक्षेपार्ह काहीच आढळून आले नाही. जिल्ह्यातील आणखी तीन संशयित पंपांची नावे निष्पन्न झाली आहेत.
पेट्रोल पंपावर मापात माप करणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील २२ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. या टोळीच्या चौकशीत सांगली जिल्ह्यातील काही पंपांची नावे निष्पन्न झाली होती. त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून ठाण्याचे पथक जिल्ह्यात तळ ठोकून आहे. आतापर्यंत पथकाने भिलवडी (ता. पलूस), अंकली (ता. मिरज), बागणी, आष्टा (ता. वाळवा), तसेच तासगाव येथे छापे टाकले आहेत. टोळीतील संशयितांनी, सांगली साखर कारखान्याजवळील दोन पंपात मापात माप करण्यासाठी ‘चीप’ दिली आहे, अशी कबुली दिली होती. त्यामुळे दुपारी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, उपनिरीक्षक अविनाश महाजन, हवालदार अंकुश भोसले, सुरेश यादव, संतोष सुर्वे, प्रशांत भुरके तसेच सांगलीच्या वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक किशोर चोरडिया, क्षेत्र सहाय्यक उदय कोळी, तसेच इंडियन आॅईलचे अभियंते यांनी संयुक्तपणे रविवारी दुपारी वसंतदादा कारखान्याच्या पंपावर छापा टाकला. या पंपावर पेट्रोल व डिझेल विक्रीची दोन यंत्रे आहेत. या दोन्ही यंत्रांची तासभर तपासणी करण्यात आली. पण त्यात आक्षेपार्ह असे काहीच आढळले नाही.
कारखान्याच्या पंपाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पथकाने माधवनगर जकात नाक्याजवळ असलेल्या सदाशिव पेट्रोलियम या पंपावर तीन वाजता छापा टाकला. याठिकाणी पेट्रोल व डिझेलची तीन यंत्रे आहेत. ही सर्व यंत्रे उघडून त्यामधील पल्सर कार्ड व पॅनल कार्डची तपासणी केली. एक लिटर, दोन, तीन, चार व पाच लिटर असे पेट्रोल बाहेर काढून त्याचे माप तपासले. मात्र मापात कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत. पाच लिटरमागे दहा मि.लि. पेट्रोल जास्त जात असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. पंपाचे मालक सुधीर पाटील यांच्यावर सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. पेट्रोल-डिझेल खरेदी व्यवहाराच्या कागदपत्रांचीही तपासणी केली. पल्सर कार्ड बदलले आहे का?, याचीही तपासणी करण्यात आली.
राज्यात १०९ पंपांवर छापे
पोलिस निरीक्षक विकास घोडके म्हणाले, टोळीतील संशयितांनी मापात पाप करण्यासाठी भारतासह परदेशातही ‘चीप’ दिली आहे. राज्यातील १०९ पंपांची नावे निष्पन्न झाली होती. सांगली, कोल्हापूर, सातारा, ठाणे, नाशिक पुणे, औरंगाबाद, नागपूर, राजगड आदी जिल्ह्यांतील पंपांवर छापे टाकले आहेत. यातील ७० पंपांत दोष आढळून आले आहेत. लिटरमागे ४० ते १८० मि.लि.चा फरक आढळून आला आहे.
तीन पंप ‘रडार’वर
पोलिस निरीक्षक विकास घोडके म्हणाले, टोळीतील संशयितांनी सांगितलेल्या माहितीवरुन सांगली जिल्ह्यातील पंपांवर छापे टाकून तपासणी सुरु ठेवली आहे. अजूनही जिल्ह्यातील तीन पेट्रोलपंप ‘रडार’वर आहेत. येत्या एक-दोन दिवसात ही कारवाई पूर्ण केली जाईल. ज्या पंपांवर दोष आढळून आले आहेत, त्यांच्यावर लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल.