सांगलीत बेकायदा लॉटरी सेंटरवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 10:59 PM2017-08-25T22:59:48+5:302017-08-25T23:00:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आॅनलाईन लॉटरीच्या नावाखाली स्टेशन रस्त्यावरील गणेश मार्केट व माधवनगर (ता. मिरज) येथे सुरु असलेल्या विनापरवाना जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री छापे टाकून एक लाखाची रोकड व यंत्रसामग्री असा पावणेदोन लाखाचा माल जप्त केला. या छाप्यात मालकांसह १३ जणांना अटक केली आहे.
गणेश मार्केटमधील कारवाईत नजीर अन्वर सय्यद (वय ३२), नजीर जमीर सय्यद (३०, दोघे रा. स्टेशन रस्ता, मिरज), सचिन मनोहर घन्ह्यारी (२५, चैतन्यनगर, सांगली), महादेव नामदेव अवताडे (३२, कर्नाळ, ता. मिरज), गणेश नामदेव जाधव (२२, वाल्मिकी आवास, जुना बुधगाव, रस्ता, सांगली), सुनील बाळासाहेब कर्नाळे (२५, खणभाग), सूरज विलास पवार (२२, शंभरफुटी रस्ता), नसरुद्दीन रियाज मकानदार (३२), अजीम दिलावर मुलाणी (२६, दोघे रा. खणभाग), सागर सिद्धू मुळीक (२७, टिंबर एरिया, सांगली) व दीपक बाळासाहेब कागले (३६, हरिपूर, ता. मिरज) यांना अटक केली आहे. माधवनगरमध्ये रामदास मनोहर पाटील (३९, रविवार पेठ, माधवनगर) व विनायक सुभाष भिसे (२०, अहिल्यानगर, कुपवाड) यांना अटक केली आहे.
आॅनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना मिळाली होती. नांगरे-पाटील गुरुवारी रात्री सांगली दौºयावर होते. त्यांच्या पथकाने सांगली शहर व संजयनगर पोलिसांची मदत घेऊन एकाचवेळी गणेश मार्केटमधील गाळा क्रमांक २, ३, ८, ९, १६ व ७९ या ठिकाणी छापे टाकले. छाप्याची चाहूल लागताच मालक व ग्राहकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडले.
छाप्यात १२ संगणक, १२ किबोर्ड, १२ माऊस, पाच प्रिंटर, ११ सीपीयू व ७५ हजाराची रोकड असा एक लाख २१ हजाराचा माल जप्त केला.
तसेच माधवनगरलाही राणाप्रताप चौकात भूमी आॅनलाईन लॉटरीवर छापा टाकून संगणक, सीपीयू, मॉनिटर क्लिप यंत्र व ३४ हजाराची रोकड असा ४४ हजाराचा माल जप्त केला. याप्रकरणी रात्री उशिरा शहर व संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.