कडेगाव, चिंचणीत तीन आॅनलाईन लॉटरीवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:30 PM2018-09-07T23:30:53+5:302018-09-07T23:30:57+5:30
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील कडेगाव शहर व चिंचणी येथे तीन आॅनलाईन लॉटरी सेंटरवर छापे टाकून ११ जणांना अटक करण्यात आली. या छाप्यात दोन लाखांचा माल जप्त केला आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली.
कडेगावच्या मुख्य पेठेतील आदर्श लॉटरी सेंटरवरील छाप्यात आनंदराव रामचंद्र पवार (वय ४०, रा. विद्यानगर, कडेगाव), सुरेश हिंदुराव जाधव (३८), सिद्धनाथ सदाशिव सूर्यवंशी (३८, हिंगणगाव खुर्द) यांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजाराच्या रोकडसह ५४ हजाराचा माल जप्त केला. कºहाड-विटा रस्त्यावरील गोल्डन लॉटरी सेंटरवरील छाप्यात नितीन जयसिंग चौगुले (२१), आदर्श अनंत पवार (१९, कडेगाव), सुशांत विठ्ठल चव्हाण (२६, गार्डी, ता. खानापूर), हणमंत रामचंद्र मोरे (४४, निमसोड, ता. कडेगाव) यांना अटक केली. १७ हजाराच्या रोकडसह ८२ हजारांचा माल जप्त केला. चिंचणीतील सोनहिरा लॉटरी सेंटरमध्ये हणमंत नाना हजारे (४६), अशोक रूपसिंह चव्हाण (३६), मोहन पोपट पाटील ३८, चिंचणी), आप्पू सखाराम अबदर (३४, सोनसळ, ता. कडेगाव) यांना अटक करून अडीच हजाराच्या रोकडसह पन्नास हजाराचा माल जप्त केला. जप्त केलेल्या साहित्यामध्ये तीन संगणक, मोबाईल प्रिंटरचा समावेश आहे.
पिंगळे यांच्यासह जयसिंगपूरच्या पोलीस उपनिरीक्षक पूनम रूगे, इचलकरंजीचे उपनिरीक्षक अमोल माळी यांच्यासह १७ जणांचा पथकात समावेश होता. रात्री उशिरापर्यंत कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
कडेगावचे पोलीस अनभिज्ञ
पथकाने कडेगाव व चिंचणी वांगी पोलिसांना कोणतीही माहिती न देता ही कारवाई केली. एकाचवेळी तीन ठिकाणी छापा टाकला. पथकातील अधिकारी व कर्मचारी साध्या वेशात होते. त्यांनी कडेगाव व चिंचणी वांगी पोलिसांसमोर चहाही घेतला. पण तरीही स्थानिक पोलिसांनी त्यांना ओळखले नाही. कृष्णात पिंगळे यांनी तासगाव व विटा येथे सेवा बजावली आहे. तरीही त्यांना कोणीच ओळखले नाही, हे विशेष!
तक्रारीमुळेच छापा
कडेगाव तालुक्यात बेकायदेशीर आॅनलाईन लॉटरी सेंटरमधून सर्वसामान्यांची लूट होत असून अनेकांचे संसार उध्द्वस्त झाले असल्याची तक्रार पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. नांगरे-पाटील यांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते.
कडेगाव तालुक्यातील बेकायदेशीर आॅनलाईन लॉटरी सेंटरवर कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले होते. त्यानुसार दोन दिवसांपासून आम्ही या लॉटरी सेंटरवर पाळत ठेवून होतो. त्यामुळे ही कारवाई यशस्वी झाली.
- कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक, जयसिंगपूर