सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या औद्योगिक निर्यातीसाठी रेल्वेची कंटेनर सेवा; उद्योजकांचा रेल्वेपुढे प्रस्ताव

By संतोष भिसे | Published: June 28, 2024 05:46 PM2024-06-28T17:46:27+5:302024-06-28T17:47:35+5:30

कोरोनाकाळातील बंद सेवा पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली

Rail container service for industrial exports to Sangli, Kolhapur, Satara | सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या औद्योगिक निर्यातीसाठी रेल्वेची कंटेनर सेवा; उद्योजकांचा रेल्वेपुढे प्रस्ताव

सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या औद्योगिक निर्यातीसाठी रेल्वेची कंटेनर सेवा; उद्योजकांचा रेल्वेपुढे प्रस्ताव

सांगली : मिरज रेल्वे जंक्शनमधून मुंबईतील न्हावा शेवा बंदरासाठी कंटेनर वाहतूक पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उद्योजक संघटनेने यासंदर्भात अधिकाऱ्यांपुढे प्रस्ताव मांडला आहे.

सांगली-मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चुअर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, संचालक संजय खांबे यांनी यासंदर्भात जंक्शनचे मालवाहतूक विभागाचे अधिकारी अब्दुल गणी यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार मिरज जंक्शनमधून स्वतंत्र कंटेनर रेल्वेद्वारे निर्यातक्षम उत्पादने मुंबईला जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टला पाठविण्याचे नियोजन आहे. कोरोना काळापूर्वी ही सेवा सुरु होती. त्यातून मिरज, सांगली व कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील परदेशी निर्यात होणारी उत्पादने बंदराकडे पाठवली जायची. उद्योजकांच्या विनंतीनुसार विशेष रेल्वे धावत असे.

कोरोनापासून ही वाहतूक बंद आहे. विनोद पाटील यांनी सांगितले की, ही सेवा पूर्ववत सुरू झाल्यास मिरज, कुपवाडसह इचलकरंजी, कोल्हापूर, बेळगाव आदी भागातील निर्यातदार उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे कंटेनर मुंबईत नेहरु पोर्ट ट्रस्टकडे पाठवण्याची सोय होणार आहे. या वाहतुकीमध्ये कृषी उत्पादनांचा समावेश नाही.

आठवड्याला ४० कंटेनर

कोरोनापूर्वी आठवड्यातून एकदा ४० कंटेनर मुंबईला जात होते. त्यातून बेळगाव, कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, सांगली, मिरज, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील औद्योगिक उत्पादने बंदरापर्यंत पोहोचविली जात होती. तेथून अमेरिकी, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, आखाती व आफ्रिकन देशांत पाठवली जायची. कोरोनापासून या वाहतुकीला ब्रेक लागला आहे. कंटेनर सेवा पूर्ववत होण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीची तयारी दर्शविली आहे.

ड्रायपोर्टला पर्याय

औद्योगिक वाहतुकीसाठी ड्रायपोर्टचा पर्याय उद्योजकांपुढे होता. पण ते अस्तित्वात येण्याची चिन्हे तूर्त नाहीत. त्यावर पर्याय म्हणून रेल्वेद्वारे कंटेनर वाहतुकीचा मार्ग उद्योजकांनी शोधला होता. सध्या कंटेनर सेवा बंद असल्याने रस्ता वाहतुकीद्वारे उत्पादने पाठवावी लागत आहेत.


कंटेनर रेल्वे सेवा लवकरात लवकर पुन्हा सुरू व्हावी यासाठी उद्योजक संघटनेचा पाठपुरावा सुरु आहे. रेल्वेकडे प्रस्ताव दिला असून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. तसे झाल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील उद्योगक्षेत्राला बळ मिळणार आहे. - विनोद पाटील, अध्यक्ष, सांगली- मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चुअर्स असोसिएशन

Web Title: Rail container service for industrial exports to Sangli, Kolhapur, Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.