रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार

By admin | Published: November 15, 2015 01:08 AM2015-11-15T01:08:28+5:302015-11-15T01:11:12+5:30

यंत्रणा हतबल : दिवाळीच्या सणात तिकीट एजंटांची चांदी

Railway e-tickets black market | रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार

Next

मिरज : रेल्वे प्रवाशांना घरबसल्या तिकीट उपलब्ध होण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ई-तिकीट सुविधेचा तिकीट एजंटांनी गैरफायदा घेतल्याने, सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळणे दुरापास्त झाले आहे. दिवाळी सुट्टीच्या हंगामात सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल असल्याने तात्काळ ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या अनधिकृत तिकीट एजंटांची चांदी झाली आहे. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एजंटांना प्रतिबंध करण्यासाठी रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणा अपुऱ्या ठरल्या आहेत.
रेल्वेच्या आरक्षित तात्काळ तिकिटांना मोठी मागणी आहे. तात्काळ तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रवाशाला व तिकीट काढणाऱ्याला ओळखपत्राची सक्ती, तात्काळ तिकीट विक्रीसाठी स्वतंत्र वेळ, तिकीट खिडकी सुरु झाल्यानंतर दोन तासानंतर ई-तिकिटाची उपलब्धता, अशा उपाययोजना रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत.
आरक्षित तिकिटासाठी रात्रभर रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर एजंट रांगा लावत होते. मात्र रेल्वे प्रशासनाने तात्काळ तिकीट विक्रीच्या धोरणात बदल करून प्रवाशांसाठी इंटरनेटवर तात्काळ ई-तिकीट उपलब्ध केले आहे. रेल्वेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या प्रवाशांना तात्काळ रेल्वे तिकीट मिळण्याची सोय आहे. मात्र या सुविधेचा अनधिकृत तिकीट एजंट फायदा घेत आहेत. वेगवेगळ्या ई-मेल आयडीद्वारे संकेतस्थळावर नोंदणी करुन त्याआधारे प्रवाशांची तात्काळ रेल्वे तिकिटे काढण्यात येत आहेत. नोंदणीनंतर एका प्रवाशास एका महिन्यात दहा तात्काळ तिकिटे मिळतात. त्यामुळे एजंटांनी पंधरा ते वीस ई-मेल अकौंट उघडून वेगवेगळ्या नावाने नोंदणी केली आहे.
मिरजेतही अनधिकृत तिकीट एजंट अशाप्रकारे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर वेगवेगळ्या नावाने नोंदणीद्वारे एटीएम कार्डाद्वारे किंवा ई-बँकिंगद्वारे तिकिटाचे पैसे भरुन तात्काळ रेल्वे तिकिटे काढत आहेत.
रेल्वे तिकीट खिडकीवर विक्री सुरु झाल्यानंतर किमान अर्धा तास मिळणारी तात्काळ तिकिटे आता ई-तिकीट व्यवस्थेमुळे केवळ पाचच मिनिटात संपत आहेत.
ई-तिकीट सुविधेची माहिती नसणारे सामान्य प्रवासी अद्यापही एजंटांवर अवलंबून आहेत. रेल्वेच्या ई-तिकीट सुविधेचा गैरवापर करुन तात्काळ तिकिटांचा काळाबाजार जोमात सुरु असताना, रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांचे दुर्लक्ष आहे. आॅनलाईन तात्काळ तिकिटे मिळत असल्याने अनधिकृत तिकीट एजंट रेल्वे स्थानकाकडे फिरकत नसल्याने, अशा तिकीट एजटांना शोधून काढणेही अवघड झाले आहे. (वार्ताहर)
प्रवाशांकडून जादा पैसे
रेल्वेने तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी मिरज-कोल्हापूरसह अन्य स्थानकांत तिकीट व्हेंडिंग यंत्राद्वारे सर्वसाधारण तिकिटे देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र या व्यवस्थेचाही एजंटांनी गैरफायदा घेण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेच्या माजी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली व्हेडिंग यंत्रे एजंटांनी ताब्यात घेतली आहेत. माजी रेल्वे कर्मचाऱ्यांऐवजी यंत्र चालविणारे एजंट तिकिटासाठी प्रवाशांकडून जादा रक्कम घेत असल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title: Railway e-tickets black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.