रेल्वेचे महाव्यवस्थापक उतरले सांगलीच्या रुळावर; पादचारी पुलाच्या प्रश्नाची दखल, प्रश्न सुटण्याची आशा

By अविनाश कोळी | Published: December 26, 2023 02:46 PM2023-12-26T14:46:59+5:302023-12-26T14:47:11+5:30

पादचारी पूल नसल्यामुळे सांगली रेल्वे स्टेशनवरील प्रवासी व हमालांना रेल्वे रूळ ओलांडणे हाच एकमेव पर्याय आहे

Railway General Manager Ram Karan Yadav visited the Sangli station and inspected it by walking on the track | रेल्वेचे महाव्यवस्थापक उतरले सांगलीच्या रुळावर; पादचारी पुलाच्या प्रश्नाची दखल, प्रश्न सुटण्याची आशा

रेल्वेचे महाव्यवस्थापक उतरले सांगलीच्या रुळावर; पादचारी पुलाच्या प्रश्नाची दखल, प्रश्न सुटण्याची आशा

सांगली : रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी नियोजित दौरा नसतानाही सांगलीच्या स्थानकाला भेट देत चक्क रुळावरुन चालत पाहणी केली. सांगली स्थानकावर प्रवासी व हमालांसाठी पादचारी पूल नसल्याने निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नाची दखल त्यांनी घेतली. आता हा प्रश्न त्यांच्यामार्फत सुटण्याची आशा येथील प्रवासी संघटनांना वाटत आहे.

पाच हजार कोटीच्या पुणे-सांगली-लोंढा रेल्वे दुपदरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पाअंतर्गत सांगली रेल्वे स्टेशनवर दोन प्रवासी गाड्यांचे व दोन मालगाड्यांचे प्लॅटफॉर्म असे एकूण चार नवे प्लॅटफॉर्म बाधण्यात आले आहेत. मात्र, सांगली रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म १, २ व ३ वरून या नवीन प्लॅटफॉर्म ४ व ५ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मपर्यंत व माल धक्क्यावर जाण्यासाठी पादचारी पुल बांधण्यात आलेला नाही.

सांगली नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी माहिती अधिकारात रेल्वे प्रशासनाकडे याची विचारणा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नव्या प्लॅटफॉर्मसाठी पूल बांधण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. पादचारी पूल नसल्यामुळे सांगली रेल्वे स्टेशनवरील प्रवासी व हमालांना रेल्वे रूळ ओलांडणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे रोज सुमारे ३ हजार हमाल व ५ हजार प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

याच प्रश्नावर सध्या प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असताना रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी सांगलीला भेट देऊन रुळावरुन चालत पाहणी केली. आता तरी हा प्रश्न सुटणार का, असा सवाल नागरिक जागृती मंचने केला आहे.

नागरिक जागृती मंचचे सवाल

कमी उत्पन्न देणाऱ्या सातारा स्थानकावर नव्याने बांधलेल्या पाचही प्लॅटफॉर्मवर तसेच मालधक्क्यापर्यंत पादचारी पूल उभारुन त्याचे उद्घाटनही झाले, मग सांगलीच्या बाबतीतच हा दुजाभाव का? उत्पन्नात पुणे विभागात आघाडीवर असूनही किरकोळ सुविधांसाठी सांगली स्थानकास संघर्ष का करावा लागतो? रुळ ओलांडून प्रवासी व हमालांनी त्यांची सोय पहावी, असा रेल्वेचा नियम आहे का?

Web Title: Railway General Manager Ram Karan Yadav visited the Sangli station and inspected it by walking on the track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.