प्लॅटफॉर्मवर दारू पिताना हटकले, कोरेगावात रेल्वे पोलिसावर हल्ला; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 02:06 PM2024-06-08T14:06:42+5:302024-06-08T14:06:50+5:30

कोरेगाव/मिरज : कोरेगाव (जि. सातारा) येथे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर दारू पिताना हटकल्याने पोलिस कर्मचाऱ्यावर तिघांनी दगडाने हल्ला केला. हल्ल्यात ...

Railway police attacked in Koregaon while drinking alcohol on platform; Three arrested | प्लॅटफॉर्मवर दारू पिताना हटकले, कोरेगावात रेल्वे पोलिसावर हल्ला; तिघांना अटक

प्लॅटफॉर्मवर दारू पिताना हटकले, कोरेगावात रेल्वे पोलिसावर हल्ला; तिघांना अटक

कोरेगाव/मिरज : कोरेगाव (जि. सातारा) येथे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर दारू पिताना हटकल्याने पोलिस कर्मचाऱ्यावर तिघांनी दगडाने हल्ला केला. हल्ल्यात पाेलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मिरज रेल्वेपोलिसांनी बिअरच्या बाटलीवरून शोध घेत तिघाही मद्यपींना चोवीस तासात जेरबंद केले.

कोरेगाव रेल्वे स्थानक शहरापासून लांब निर्जनस्थळी असल्याने रात्रीच्या वेळी पोलिस बंदोबस्त असताे. गुरुवार दि. ६ जून रोजी रात्री ९ वाजता रेल्वे स्थानकावर कर्तव्यास असलेले रेल्वे पोलिस शिपाई राजेंद्र श्रीरंग शिंदे यांना प्लॅटफॉर्मवर तीन अनोळखी व्यक्ती मद्यप्राशन करीत बसल्याचे दिसले. त्यांनी हटकले असता तिघांनी राजेंद्र शिंदे यांच्यावर हल्ला केला. दगडाने डोक्यात व पायावर मारून जबर जखमी केले. अतिरक्तस्त्राव होत असल्याने त्यांनी स्थानक अधीक्षक कार्यालयात प्रथमोपचार घेतले. 

याबाबत माहिती मिळताच सातारा रेल्वे पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार आदिनाथ भोसले, नितीन थोरात व दीपक घाडगे यांनी कोरेगावात येऊन शिंदे यांना सातारा येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले. याबाबत मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पुणे रेल्वे पोलिस अधीक्षक तुषार दोशी व उपविभागीय पोलिस अधिकारी संगीता हत्ती यांनी घटनास्थळी भेट दिली. रेल्वे पोलिसांनी तपास पथके तयार करून हल्लेखाेरांच्या शोधासाठी रवाना केली. 

तपास पथकाने घटनास्थळी मिळालेल्या बिअरच्या बाटलीवरील बॅचनंबर वरून कोरेगाव शहरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाईन शॉपची माहिती घेतली. तेथील सीसीटीव्हीची तपासणी करून त्याआधारे कोरेगाव पोलिसांच्या मदतीने हल्लेखाेर सोमनाथ दत्तात्रय घाडगे (वय २९), रोहित साहेबराव तुपे (२१, दोघे रा. दत्तनगर, कोरेगाव), अक्षय महेंद्र लोहार (२४, रा. कुमठे, ता. कोरेगांव) यांना चोवीस तासात अटक केली. हल्लेखाेरांनी गुन्हा कबूल केला असून तिघांनाही आज-शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Railway police attacked in Koregaon while drinking alcohol on platform; Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.