रेल्वे पोलिस खरे सांगताहेत की मध्य रेल्वे प्रशासन ?, सांगलीतील चिंतामणीनगर पुलाच्या मुदतवाढीचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:44 PM2024-08-16T17:44:01+5:302024-08-16T17:44:22+5:30
सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा गोंधळ अजून संपलेला नसताना त्याच्या मुदतवाढीवरूनही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आंदोलनाचा इशारा ...
सांगली : चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा गोंधळ अजून संपलेला नसताना त्याच्या मुदतवाढीवरूनही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आंदोलनाचा इशारा दिलेल्या सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांना मध्य रेल्वेने दिलेले पत्र व रेल्वे सुरक्षा दलाने दिलेली नोटीस यात पुलाचे काम पूर्ण होण्याच्या तारखा वेगवेगळ्या दिल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्याच या गोंधळावर समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सतीश साखळकर यांना रुळावर स्वातंत्र्य दिन साजरा न करण्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये चिंतामणीनगरचा उड्डाणपूल पूर्ण करण्यास १० सप्टेंबर २०२४ ची मुदत दिल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्यांनी साखळकर यांना एक पत्र देऊन पुलाच्या कामाबाबत काही स्पष्टीकरण दिले आहे. यात त्यांनी हा पूल ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे रेल्वेच्याच दोन वेगवेगळ्या विभागांनी दिलेल्या दोन वेगळ्या तारखांमुळे सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत.
तारीख पे तारीखचा खेळ
उड्डाणपुलाचे काम १० जून २०२३ पासून सुरू झाले होते. १० जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात जानेवारीची मुदत पुन्हा मार्चपर्यंत पुढे गेली. त्यानंतर वारंवार मुदतवाढ देत वर्ष उलटले. एक वर्षानंतरही काम पूर्ण न झाल्याने पुलाचे वर्षश्राद्ध घालण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी या पुलास १५ ऑगस्टची अंतिम मुदत दिली. आता रेल्वेने सप्टेंबरमधील दोन वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत.
खरे कोण अन् खोटे कोण?
मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाचे पत्र व रेल्वे पोलिस दलाची नोटीस सोशल मीडियावर प्रसिद्ध करून सर्वपक्षीय समितीने यातील कोणती तारीख खरी आहे, असा सवाल उपस्थित केला. सोशल मीडियावर नागरिकांनी या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.
किती दिवस नागरिकांचे हाल?
सांगलीसह उत्तर बाजूस असलेले तालुके, प्रमुख गावांना या पुलाअभावी मोठा फटका बसला आहे. व्यापार, उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. नागरिक, विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गाने जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. हे हाल आणखी किती दिवस राहणार, असा हताश सवालही सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.