रेल्वे वाहतूक सुरक्षिततेची परीक्षा ?

By admin | Published: July 5, 2016 10:32 PM2016-07-05T22:32:29+5:302016-07-06T00:38:48+5:30

मुसळधार पाऊस : दरडींच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नजर

Railway traffic safety test? | रेल्वे वाहतूक सुरक्षिततेची परीक्षा ?

रेल्वे वाहतूक सुरक्षिततेची परीक्षा ?

Next

प्रकाश वराडकर-- रत्नागिरी -कोकण रेल्वेने गेल्या काही वर्षांतील मार्गावरील धोके ओळखून पावसाळापूर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसातही काही अपवादवगळता कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत सुरू आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिला किंवा अचानकपणे काही दिवस पाऊस गायब झाला तर मात्र कोकण रेल्वेच्या मार्ग सुरक्षिततेची परीक्षा ठरू शकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत असत. त्यामुळे अनेकदा काही दिवसांसाठी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशाांचे प्रचंड हाल झाले होते. दरडी कोसळल्याने रेल्वेला अपघातही झाले होते. या संकटांतून बाहेर पडण्याचा अनुभव घेणाऱ्या कोकण रेल्वेने त्यानंतरच्या काळात मार्गावर दरड कोसळणे, पाणी साचणे यांसारख्या समस्यांवर चांगल्या उपाययोजना केल्या आहेत.
मार्गावर अनेक ठिकाणी असलेली डोंगरांची उभी कटिंग्ज धोकादायक ठरल्याचे लक्षात आल्यानंतर ही कटिंग्ज आणखी कमी करण्यात आली व मार्ग सुरक्षित करण्यात आला. विशेषत: पोमेंडीतील डोंगराने कोकण रेल्वेला सर्वाधिक त्रास दिला. पावसाळ्यात दरड मार्गावर कोसळण्याचे प्रकार याठिकाणी अनेकदा झाले. त्यासाठी केलेली कॉँक्रीट भिंतीची उपाययोजनाही असफल ठरली. त्या भिंतीसह दरड मार्गावर कोसळली होती. पावसाळ्यातील या संकटांमुळे कोकण रेल्वेचे अभियंतेही हतबल झाले होते. मात्र, गेल्या दोन तीन वर्षात यामध्ये मोठ्या सुधारणा झाल्या असून, ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे, तेथे डोंगर मागे हटवण्यात आले आहेत.
यंदा २० जूननंतरच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. गेल्या पंधरा दिवसात रत्नागिरी विभागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे कोकण रेल्वेला अतिवृष्टीचा फटका बसू शकतो.
तसेच अचानकपणे काही दिवसांसाठी पाऊस गायब झाला व नंतर सुरू झाला तर पाऊस नसलेल्या काळात मार्गालगतच्या पाण्याने फुगलेल्या डोंगरांना भेगा पडतील व त्यानंतर पडणाऱ्या पावसात दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पुढील काही दिवसात मार्गावरील सुरक्षिततेबाबत कोकण रेल्वेची खऱ्या अर्थाने परीक्षाच होणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच कोकण रेल्वेला पावसाळ्याचे तिन्ही महिने मोठी सत्वपरीक्षा द्यावी लागणार आहे.


दुर्घटना : मार्गालगतच्या मोठ्या वृक्षांबाबतही हवी सावधानता
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. दुपदरीकरणासाठी डोंगर, बोगद्यांमध्ये कटाई नव्याने करावी लागणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची दरडींची भीती यावर्षी कमी झाली असली तरी भविष्यात दुपदरीकरणानंतर नव्याने ही समस्या निर्माण होणार आहे. कोकणातील माती भुसभुशीत असल्याने मोठा पाऊस पडल्यास ती निसटते आणि रेल्वे रुळावर येते. ही समस्या थोडीफार कमी झाली आहे. मात्र, संपलेली नाही.


कोकण रेल्वेमार्गावर वीर ते करंजाडी दरम्यान चालत्या गाडीवर झाड कोसळून दोन दिवसांपूर्वीच दुर्घटना झाली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे दरडी कोसळणे, दगड मार्गावर येणे, याबरोबरच आता मार्गालगत असलेल्या धोकादायक वृक्षांबाबतही निर्णय घेण्याची वेळ कोकण रेल्वेच्या प्रशासनावर आली आहे.

Web Title: Railway traffic safety test?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.