मिरजेतून रेल्वेने दिल्लीला गुलाबाची निर्यात सुरू, 'व्हॅलेंटाइन डे'साठी गुलाबाचे दर वधारले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:31 PM2023-02-06T12:31:02+5:302023-02-06T12:32:11+5:30
फुलांना मागणी नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना व्हॅलेंटाइन डेचा आधार मिळाला
सदानंद औंधे
मिरज : व्हॅलेंटाइन डे साठी दिल्ली जरबेरा, कार्नेशिया, गुलाब व डच गुलाब या हरितगृहांतील फुलांना मागणी असल्याने दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हॅलेंटाइन डे साठी हरितगृहातील फुलांची निर्यात सुरू झाली आहे. व्हॅलेंटाइन डे साठी मागणी असल्याने डच गुलाबांचा दर वधारला आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाइन डे साठी हरितगृहातील गुलाबाच्या फुलांना मागणी असल्याने मिरजेतून दिल्लीला रेल्वेने फुलांची निर्यात सुरू झाली आहे. यावर्षी डच गुलाबाचे उत्पादन कमी असल्याने जरबेरा व कार्नेशिया या फुलांची निर्यात जास्त आहे. मिरजेतून गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून दिल्लीला फुले पाठविण्यात येत आहेत.
उत्तर भारतात थंड हवामान असल्याने फेब्रुवारी महिन्यास सुरुवात झाल्यानंतर दिल्लीला फुले जात आहेत. या फुलांचा दिल्लीत शीतगृहात साठा करण्यात येतो. व्हॅलेंटाइन डे साठी मागणी असल्याने एरवी पाच रुपये दर असलेल्या डच गुलाबांच्या फुलांना पंधरा ते वीस रुपये दर मिळत आहे. कार्नेशिया व जरबेरा या फुलांनाही चांगला दर मिळत आहे. मात्र, मालवाहतुकीसाठी रेल्वेच्या भाडेवाढीमुळे फुलांची निर्यात महागली आहे.
मिरज रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे तीनशे बॉक्स गुलाब व जरबेरा फुले दिल्लीला जात आहेत. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलांचे उत्पादन होत नसल्याने दिल्लीला मागणी व दर जास्त आहे. यामुळे दिल्लीला गुलाबाच्या फुलांच्या निर्यातीचे प्रमाण मोठे आहे. व्हॅलेंटाइन डे साठी फुलांचा दर वधारला असून डच गुलाबास दहा रुपये दर मिळत आहे.
मात्र, प्रत्येकी चारशे फुले असलेल्या बॉक्सला आकारमानाप्रमाणे दोनशे ते अडीचशे रुपये आकारणी करण्यात येते. दिल्लीला फुले पाठविण्यासाठी आकारमानाऐवजी प्रतिकिलो दर आकारणीची निर्यातदारांची मागणी आहे.
शेतकऱ्यांना आधार
फुलांना मागणी नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना व्हॅलेंटाइन डेचा आधार मिळाला आहे. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेसाठी मिरजेतून दररोज तीनशे बॉक्स फुले दिल्लीला जातात. यावर्षीही डच गुलाबाला मागणी असल्याचे फुलांचे व्यापारी व निर्यातदार राजू बागणीकर यांनी सांगितले.
गुलाब ३०० रुपयांवर
व्हॅलेंटाइन डे मुळे स्थानिक बाजारातही गुलाबाचा दर प्रति शेकडा २०० रुपयांवरून ३०० रुपयांवर पोहचला आहे. जरबेरा व कारनेशिया या फुलांचे दरही वाढले आहेत. पुढील महिन्यात महाशिवरात्रीसाठी पांढऱ्या रंगांच्या फुलांना मागणी असल्याने निशिगंध, लिली, पांढरी शेवंती या फुलांचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे फुलांचे विक्रेते आनंद माळी यांनी सांगितले.